बदनापूर (जालना) - तालुक्यातील कुसळी येथे शेतीला पाणी भरण्यासाठी विहिरीतील मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या दोन अठरा वर्षीय आते-मामेभावांचा मोटार सुरू करूनही पाणी येत नसल्यामुळे दोघे पाण्यात पाइप बघण्यासाठी उतरले असता विजेचा धक्का लागून विहिरीत पडून दोघांचाही बुडून मृत्यू झाला.
प्रदीप कैलास वैद्य (वय १८, रा. कुसळी) व गणेश कृष्णा तार्डे (वय १८, अंबड), असे त्या दोघांची नावे आहेत. ही विहीर काठोकाठ भरलेली असल्यामुळे बुडालेल्या दोघांचा शोध घेण्यासाठी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले.
भोकरदन तालुक्यातील तीन सख्ख्या भावांचा विद्युत मोटार सुरू करताना विजेचा धक्का लागून विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच बदनापूर तालुक्यातील कुसळी येथेही अशीच घटना घडल्यामुळे कुसळी गावावर शोककळा पसरली आहे. कुसळी ते माळेगाव रस्त्यावरील गट क्रमांक ९३ मधील शिवाजी दत्तात्रय वैद्य यांच्या शेतीतील विहिरीत ही करूण घटना घडलेली असून काठोकाठ भरलेल्या या विहिरीतील मोटार शेतीच्या सिंचनासाठी चालू करण्याच्या प्रयत्नात या दोन्ही अठरा वर्षीय तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे.