जालना - इंडियन प्रीमिअर लीगमधील (आयपीएल) सामन्यावर सट्टा लावणाऱ्या मुख्य आरोपीसह अन्य एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून साडे चार हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
'आयपीएल'वर सट्टा : दोघेजण पोलिसांच्या ताब्यात; जालन्यातील प्रकार - स्थानिक गुन्हे शाखा कारवाई जालना
आयपीएलवर सट्टा लावल्यामुळे दोन जणांना जेरबंद करण्यात आले आहे. ही कारवाई जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली.
रविवारी 4 ऑक्टोबरला चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स इलेव्हन या दोघांमध्ये सामना होता. सामन्यादरम्यान कोण जिंकणार? कोण हरणार? याविषयी बस स्थानक परिसरात सट्टा खेळला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी प्रशांत देशमुख हे आपल्या सहकाऱ्यांसह आणि पंचांना सोबत घेऊन संग्रामनगर भागात गेले. यावेळी तिथे वाट्यावर बसून फोनवरून सट्टा लावणाऱ्या संग्राम नगर भागातील जीवन फुलचंद भगत याला ताब्यात घेण्यात आले. त्याची अधिक विचारपूस केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, त्याच्याकडून भ्रमणध्वनी घेऊन त्याची ध्वनिफीत तपासली असता त्याने हा सट्टा प्रिती सुधा नगर येथे राहणाऱ्या आनंद मंत्री यांच्या सांगण्यावरून खेळवल्या जात असल्याचे सांगितले.
तर भगत याच्या मोबाईलची रेकॉर्डिंग तपासले असता अन्य काही जणांची बोलणेही ऐकायला मिळाले. या प्रकारावरून स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी भगत आणि मंत्री यांना ताब्यात घेतले. त्यांची अधिक चौकशी सुरू आहे. यावेळी भगतकडून पोलिसांनी 3200 रुपयांसह अन्य साहित्य मिळून एकूण 4 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई करण्यासाठी विनोद गडदे, कृष्णा तंगे, सोमनाथ उबाळे आदी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.