जालना -खरीप हंगाम 2019 मध्ये उत्पादन केलेल्या सोयाबीनमधून अनेक शेतकऱ्यांनी या वर्षीसाठी कांही बियाणे म्हणून सोयाबीन बाजूला काढून ठेवले आहे. मात्र त्यावेळी सोयाबीन पावसात भिजले असल्यामुळे याच्या उगवण क्षमतेबद्दल शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे हे बियाणे पेरल्यानंतर उगवले नाही तर, शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विभागाच्या वतीने आजपासून "सोयाबीनची उगवण क्षमता तपासण्याची मोहीम" हाती घेण्यात आली आहे. याची सुरुवात जालना तालुक्यातील शिरसवाडी येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांच्या उपस्थितीत झाली.
जालना : सोयाबीनच्या उगवण क्षमतेबद्दल शेतकऱ्यांना प्रशिक्षण, कृषी अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन - jalna news today
उगवण क्षमता तपासण्यासाठी बीज शितल कंपनीच्या सहकाऱ्याने सुमारे 80 हजार रुपयांचे जर्मिनेशन पेपर कृषी अधीक्षक कार्यालयाला उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्ह्यामध्ये त्या-त्या तालुका कृषी अधिकाऱ्यांमार्फत कृषी सहाय्यकांच्या माध्यमातून अनेक गावांमध्ये ही मोहीम राबविली जात आहे.
तपासणीसाठी घेतलेल्या सोयाबीन बियाण्याची उगवण्याची क्षमता चौथ्या किंवा पाचव्या दिवशी शेतकऱ्यांना समजेल आणि त्यानुसार शेतकऱ्यांनी निवडलेल्या सोयाबीन बियाण्याची किती प्रमाणात पेरणी करायचे हे ठरवता येईल तसेच सोयाबीन न उगवल्याल्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सिरसवडी येथे झालेल्या कार्यक्रमाच्या वेळी जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी सुधाकर कराड, कृषी सहाय्यक शिंदे पी. ए. कृषी सहाय्यक गोविंद पोळ, शिरसवाडीच्या सरपंच कालिंदा कैलास ढगे, कृषिभूषण रावसाहेब ढगे यांच्यासह गावातील अनेक शेतकऱ्यांची उपस्थिती होती.