महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जालन्यात प्रशासनाचे फक्त कागदी घोडे; वर्षभरात १ टक्काही 'व्यसनमुक्ती' नाही

१ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ दरम्यान पूर्ण जिल्ह्यामध्ये व्यसनमुक्त होऊ इच्छिणाऱ्या २१ हजार ४०४ व्यक्तींनी आपले नाव नोंदवले होते. मात्र, या विभागामार्फत फक्त १६८ नागरिकांनाच व्यसनमुक्त करण्यात यश मिळाले आहे.

जागतिक तंबाखूविरोधी दिन

By

Published : May 31, 2019, 10:23 AM IST

जालना- जगभरात ३१ मे हा दिन जागतिक तंबाखूविरोधी दिन म्हणून पाळला जातो. तंबाखूजन्य पदार्थ खाणाऱ्यांना या व्यसनापासून दूर करण्यासाठी प्रशासनाच्यावतीने जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अंतर्गत सामान्य रुग्णालयात एक विशेष विभाग काम करतो. या विभागाने १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत पॉईंट ७८ टक्केच काम केले, विशेष म्हणजे या विभागासाठी विशेष कर्मचारी असताना एक टक्का देखील काम न झाल्यामुळे शासन हा विभाग चालवतो कशासाठी? असा प्रश्न सुज्ञ नागरिकांना पडला आहे.

जालन्यात प्रशासनाचे फक्त कागदी घोडे; वर्षभरात १ टक्काही 'व्यसनमुक्ती' नाही

जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तीन विशेष कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यामध्ये एक जिल्हा सल्लागार, एक सामाजिक कार्यकर्ता आणि एक समुपदेशक अशी तीन पदे शासनामार्फत भरली आहेत. तंबाखूजन्य पदार्थ असलेल्या म्हणजेच गुटका, सिगारेट, तंबाखू अशा पदार्थांपासून जनतेला परावृत्त करणे हा या विभागाचा मुख्य उद्देश आहे. असे असतानाही या विभागाने केवळ ०.७८ टक्केच काम केल्याचे समोर आले आहे.

१ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ दरम्यान पूर्ण जिल्ह्यामध्ये व्यसनमुक्त होऊ इच्छिणाऱ्या २१ हजार ४०४ व्यक्तींनी आपले नाव नोंदवले होते. मात्र, या विभागामार्फत फक्त १६८ नागरिकांनाच व्यसनमुक्त करण्यात यश मिळाले आहे. या विभागाचे जिल्हा सल्लागार डॉ. संदीप गोरे यांनी सांगितले की, संबंधित व्यसनाधीन व्यक्तीने नाव नोंदणी केल्यानंतर तीन वेळा त्याचे समुपदेशन केले जाते, एक महिना पाठपुरावा केला जातो. त्याने जर सहा महिन्यात व्यसन केलेच नाही. तर, तो व्यक्ती व्यसनमुक्त झाला आहे, असे समजले जाते. अशा १६८ व्यक्ती जालना जिल्ह्यात व्यसनमुक्त केल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान सिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा २००३ च्या कलम ४ नुसार सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास बंदी आहे, याचे उल्लंघन केल्यास जास्तीत जास्त दोनशे रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. अशा प्रकारचा दंड सामान्य रुग्णालयात आलेल्या ८१८ लोकांकडून तेवीस हजार चारशे वीस रुपये दंड मागील आर्थिक वर्षात वसूल केला आहे. तसेच या कायद्याविषयी जनजागृती करण्यासाठी विविध ३३ ठिकाणी प्रशिक्षण देण्यात आले असून ८४ शाळांच्या माध्यमातून २२ हजार ८६४ विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त शासकीय रुग्णालयात कर्मचाऱ्यांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात येणार आहे. यावेळी सामान्य जनतेनेही उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एम.के. राठोड यांनी केले आहे.

काय आहे कायदा

सिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा २००३ या कायद्यातील कलम ४ नुसार सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास बंदी आहे. उल्लंघन केल्यास दोनशे रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.

कलम 5 - तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष जाहिरातीवर बंदी, पहिला गुन्हा दोन वर्षापर्यंत शिक्षा किंवा एक हजार रुपयांपर्यंत दंड.

कलम 6 - (अ) अल्पवयीन व्यक्तीस तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणे हा दंडनीय गुन्हा आहे, उल्लंघन केल्यास दोनशे रुपये दंड. (ब )शैक्षणिक संस्थांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यास बंदी आहे. उल्लंघन केल्यास दोनशे रुपये दंड.

कलम 7 - तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या वेस्टनावावर धोक्याची सूचना देणे.

तंबाखू सेवनाचे हे दुष्परिणाम होऊ शकतात

तोंडाचा कॅन्सर, टीबी, हृदयरोग, यकृताचा आजार, लकवा, मधुमेह, पुरूषांमध्ये नंपुसकत्व येणे, मोतीबिंदू.

ABOUT THE AUTHOR

...view details