जालना - पारंपरिक व्यवसायात मिळणाऱ्या उत्पन्नात समाधान मानत जालना तालुक्यातील जळगाव (सोमनाथ) येथील पेरे कुटुंबीयांच्या तीन पिढ्या गौरी-गणपती घडवण्यात व्यस्त आहेत. ज्या मुलांच्या हातात उजळणी आणि शुद्धलेखनाचे धडे गिरवण्यासाठी पेन, पेन्सिल पाहिजे त्या चिमुकल्यांच्या हातात कोरोनामुळे रंगाचे ब्रश आले आहेत. यावर्षी कोरोनाचे संकट असल्यामुळे गणपती मूर्तींच्या उंचीवर बंधने आली आहेत. या प्रकारामुळे मूर्तीकारांचा व्यवसाय संकटात आला आहे.
जालना तालुक्यातील जळगाव (सोमनाथ) येथील पेरे कुटुंबीयांच्या तीन पिढ्या गौरी-गणपती घडवण्यात व्यस्त आहेत बारा बलुतेदारांपैकी कुंभारकाम हा एक व्यवसाय आहे. या समाजातील अनेक लोक आपला पारंपरिक व्यवसाय सोडून दुसऱ्या व्यवसायाकडे वळले आहेत. मात्र, जालना तालुक्यातील जळगाव(सो) येथील राधाकिसन गोकुळ पेरे यांचे एकत्रित कुटुंब आणि तिन्ही पिढ्या याच व्यवसायात आहेत. गौरी-गणपतीचा सण तोंडावर आला असून यावर्षी या सणाला कोरोनाचा विळखा आहे. लॉकडाऊननंतर दुकानदारांनी रंग आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या भावामध्ये वाढ केली आहे. चढ्या भावाने साहित्य खरेदी करून केलेल्या मूर्ती चढ्या भावाने विकल्या जातील का? असा प्रश्न या कुटुंबाला पडला आहे.
कोरोना महामारीमुळे यावर्षी लग्न संख्याही घटली आहे. त्याचा अप्रत्यक्ष परिणाम गौरीच्या मुखवट्यावर झाला आहे. प्रथेनुसार लग्न झाल्यानंतर पहिल्या वर्षी मुलीकडचे मुलाकडच्यांना गौरीचे मुखवटे देऊन सन्मानित करतात. मात्र, या वर्षी लग्न संख्या घटली आणि त्यासोबत मुखवट्यांची ही संख्या घटवावी लागली. कुंभार व्यवसायात अनेक अडचणी असतानाही राधाकिसन पेरे आणि त्यांची पत्नी रुक्मिणी पेरे हे दोघे पुढील पिढीला व्यवसायाचे मार्गदर्शन करतात. त्यांच्यानंतर दुसरी पिढी सुनील-संगीता आणि गुलाब-गीता हे आता प्रत्यक्ष काम करत आहेत. तर तिसरी पिढी म्हणजे सुनील आणि गुलाब यांची मुले देखील गणपती आणि गौरीच्या मूर्तींची सजावट करण्याचे काम शिकत आहेत.
मागील वर्षी गौरीचे दोन मुखवटे आणि दोन पिलवंड असे 400 ते 600 रुपयापर्यंत विकले गेले. यावर्षी मात्र अद्याप भाव ठरलेला नाही. पीओपी आणि रंगाचे भाव वाढल्यामुळे निश्चितच मूर्तीकारांनाही भाव वाढवण्याशिवाय पर्याय नसल्याचे पेरे कुटुंबीयांनी सांगितले. कोरोनामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सुमारे 70 हजार रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता पेरे कुटुंबीयांनी वर्तवली आहे.