जालना - जालना शहरात कोरनबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केली आहेत. मात्र, नागरिक अद्यापही आवश्यक तितकी खबरदारी घेताना दिसत नाही. त्यामुळे पोलीस प्रशासन देखील त्रस्त झाले आहे. पंरतु, येथून पुढे नागरिकांना शिस्त लावण्यासाठी पोलीस प्रशासन कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी दिली.
उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांची प्रतिक्रिया... हेही वाचा...संतापजनक... मेळघाटात आठ महिन्यांच्या बाळाला गरम विळ्याचे चटके
जालना शहरात तीन दिवसांचा जनता कर्फ्यू
जालना शहरात आजपासून (शुक्रवार) व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने तीन दिवसांचा जनता कर्फ्यू सुरु केला आहे. याला पोलीस प्रशासनाने पाठिंबा देऊन एक प्रकारे मदत केली आहे. आज पहिल्याच दिवशी बंद संदर्भात स्वातंत्र्यवीर सावरकर चौकामध्ये व्यापारी आणि पोलीस प्रशासन यांच्यामध्ये समन्वय बैठक झाली. या बैठकीमध्ये व्यापाऱ्यांना बंद ठेवण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन पोलीस प्रशासनाने दिले आहे.
या बैठकीला उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खीरडकर, सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक छत्रभुज काकडे, नगरपालिकेचे मुख्य कार्य मुख्याधिकारी नितीन नार्वेकर, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सतीश पंच, विनीत सहानी, श्याम सुंदर लोया, यांच्यासह शहरातील अनेक व्यापाऱ्यांची उपस्थिती होती.