जालना - भोकरदन तालुक्यातील पाळसखेड पिंपळे येथील तीन सख्ख्या भावांचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री उघडकीस आली. तिघे भाऊ शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेल्याची माहिती असून यातील एकाचा तीन महिन्यापूर्वीच विवाह झाला होता.
पाळसखेड पिंपळे येथील ज्ञानेश्वर आप्पासाहेब जाधव (वय 26), रामेश्वर आप्पासाहेब जाधव (वय 26) व सुनील आप्पासाहेब जाधव (वय 18) हे तिघे भाऊ बुधवारी रात्री जेवण करून 8 वाजण्याच्या सुमारास शेतात गव्हाच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेले. पाणी देण्यासाठी एकाने विहिरीवरील विद्युत पंप सुरू करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याला विद्युत धक्का बसून तो विहिरीत कोसळला. इतर दोघांनी त्याला वाचविण्यासाठी लगेच विहिरीत उडी घेतली. मात्र तीनही भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
रात्री उशीर झाला तरी तिघे घरी परतले नाही म्हणून जाधव कुटुंबीय चिंतेत पडले. मोबाईलवरील कॉल सुद्धा कोणीही उचलत नव्हते. म्हणून त्यांनी नातेवाईकांना याबाबत सांगितले. त्यानंतर मध्यरात्री 2 वाजता नातेवाईक शेतात गेल्यानंतर तिघेही विहिरीत बुडल्याचे निदर्शनास आले. माहिती मिळताच हसनाबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह विहिरीतून बाहेर काढले. यानंतर राजूर येथे ते मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले.