जालना- तिसऱ्या लाटेला आता सुरुवात झाली ( Third Wave of Corona ) असून या लाटेचा प्रादुर्भाव कधीपर्यंत राहील हे सांगता येत नाही. पण, जानेवारी अखेरपर्यंत ही लाट कायम असेल, असा अंदाज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे ( Health Minister Rajesh Tope ) यांनी व्यक्त केला आहे. सोमवारी (दि. 10 जानेवारी) राजेश टोपे हे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी घेतलेल्या कोरोना आढावा बैठकीला उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
पालकांनी सहकार्य करावे अन् राजकीय पक्षांनी कार्यक्रम रद्द करावे -सध्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यांतील शाळा बंद करण्यात आल्या असून ( School Closed in Maharashtra ) विद्यार्थ्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे पालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करत शाळा बंदच राहतील, असे टोपे म्हणाले. राज्यातील अनेक राजकीय नेते कोरोना नियम आणि निर्बंधाचे पालन करत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करून नियम पाळावे आणि महिनाभर राजकीय पक्षांनी आपापले कार्यक्रम रद्द करावे, असे आवाहनही टोपे यांनी केले आहे.