बदनापूर (जालना) - बदनापूर शहरातील रेल्वे स्टेशन रोडवर असलेल्या भारतनगर वसाहतीत चोरट्यांनी घरफोडी केली. चोरट्यांनी घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यासह तब्बल १० लाख ४१ हजारांवर डल्ला मारला. ही घटना २१ ते २२ डिसेंबरच्या मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास घडली. चार चोरटे घरासमोरच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
बदनापूरात साडेदहा लाखांची घरफोडी; चोरटे सीसीटीव्हीत कैद - Badanapur burgling case
साडेदहा लाखांची घरफोडी झाल्यामुळे बदनापूर शहरात खळबळ उडाली आहे. ही घटना २१ ते २२ डिसेंबरच्या मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास घडली.

बदनापूर शहरातील भारतनगर, रेल्वेस्टेशन रोडवर व्यापारी नदीम बेग इद्रीस बेग मिर्झा यांचे घर आहे. २१ डिसेंबरला घरातील कुटुंबासोबत समोरच्या बाजूला असलेल्या रूममध्ये होते. रात्री 2 वाजण्याच्या सुमारास चार चोरट्यांनी घरामागील दरवाजातून प्रवेश केला. घरातील कपाटातील १५.५ तोळे सोने ( किंमत ४ लाख ९५ हजार), गल्ल्यातील रोख रक्कम ५ लाख ४६ हजार रुपये असा एकूण १० लाख ४१ हजार रुपये नगदी व सोन्याचे दागिने असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
याप्रकरणी नदीम बेग इद्रीस बेग मिर्झा यांच्या तक्रारीवरून बदनापूर पोलीस ठाण्यात चार चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक भिमाळे हे करीत आहेत. दरम्यान घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी भेट दिली आहे. याच रात्री चोरट्यांनी दोन ते तीन ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला असल्याचे गावकरी सांगतात. घरफोडी झालेल्या बाजूस सीसीटीव्हीमध्ये हे चोरटे चित्रित झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. साडेदहा लाखांची घरफोडी झाल्यामुळे बदनापूर शहरात खळबळ उडाली आहे.