जालना - ज्येष्ठ नागरिकांना ५५ रुपयात ४ हजार किलोमीटरचा फुकटचा प्रवास मिळणार आहे, अशा पद्धतीचा संदेश सोशल मीडियावर आणि तोंडी फिरत आहे. मात्र, अशा प्रकारची कोणतीही योजना राज्य परिवहन महामंडळाने घोषित केली नाही. तरीही लोक या विषयी पूर्ण माहिती न घेता अर्धवट माहितीच्या आधारे बस स्थानकात गर्दी करत आहेत. त्यामुळे या लोकांची तारांबळ उडत आहे.
बस स्थानकात गेल्या ४ दिवसापासून ६५ वर्षापुढील जेष्ठ नागरिकांची प्रचंड गर्दी होत आहे. या सर्वांना ५५ रुपयात ४ हजार किलोमीटर फुकटचा प्रवास मिळणार आहे, एवढीच माहिती आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातील जेष्ठ नागरिक बस स्थानकात गर्दी करत आहेत. मात्र, परिस्थिती वेगळीच आहे. एसटी महामंडळाने आता हळूहळू आधारकार्ड वरील ज्येष्ठ नागरिकांचे अर्धे तिकीट बंद करण्याचे ठरवले आहे. त्या अनुषंगाने ज्येष्ठ नागरिकांकडून ५५ रुपये घेऊन त्याची पावती दिली जात आहे. काही दिवसातच या ५५ रुपयांच्या बदल्यात ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहे. या कार्डवर संबंधिताचा फोटो आणि इतर माहिती असणार आहे. तसेच या कार्डमध्ये जर बॅलन्स टाकला तरच प्रवास करता येणार आहे. अन्यथा पूर्ण तिकीट काढावे लागणार आहे. ५५ रुपये घेऊन स्मार्ट कार्ड दिल्यानंतरही बसमध्ये चढल्यावर स्मार्ट कार्डमध्ये जेवढा बॅलेन्स आहे तेवढ्याच तिकिटांचा प्रवास करता येणार आहे.
अशी आहे योजना