जालना -पुणे जिल्हयातील पुरंदर तालुक्यात 'झिका'चा रुग्ण आढळून आला आहे. याबाबत काळजी करण्याची गरज नाही, या आजाराच्या रुग्णामध्ये जी लक्षणे आढळून आली आहे. त्यानुसार उपचार केले जात आहे. पुरंदर तालुक्यात साठलेल्या गोड पाण्यावर ईडीस डासांची उत्पत्ती होऊ नये, म्हणून आवश्यक पाऊल उचलून सर्वेक्षण करण्याचे आदेश आरोग्य विभागाला देण्यात आल्याची माहिती देखील आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
'झिका'चा पहिला रुग्ण आढळला, मात्र चिंतेचे कारण नाही; वाचा, आरोग्यमंत्री काय म्हणाले? कोरोना लसीकरण करण्याला प्राधान्य द्या-
राज्यात निर्बंध हटवण्यासंदर्भात संपूर्ण गृहपाठ झाला असून टास्क फोर्ससह सर्वांची मते आलेली आहे. याबाबत मुख्यमंत्री लवकरात लवकर निर्णय घेणार असल्याचे देखील टोपे म्हणाले. राज्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढत नसून दीड महिन्यापासून ५ ते ७ हजारांच्या दरम्यान कोरोनाबाधितांचा आकडा रोज येतो आहे. त्यासाठी ही संख्या कमी करण्यासाठी कोरोना लसीकरण करण्याला प्राधान्य द्या, असे आवाहन देखील राजेश टोपे यांनी केले. राज्यात सध्या साथीचे आजार पसरत असून आरोग्य विभाग याबाबत योग्य कारवाई करेल असेही ते म्हणाले.
पुण्यात झिका व्हायरसचा पहिला रुग्ण प्रकृती ठणठणीत
पुणे जिल्ह्यामधील पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे झिका व्हायरसचा एक रुग्ण आढळून आला असून हा या आजाराचा महाराष्ट्रातील पहिला रुग्ण आहे. झिका व्हायरसची लागण झालेली महिला पूर्णपणे बरी झाली असून तिला तसेच कुटुंबियांमध्येही कोणाला काही लक्षणे नाहीत, असे आरोग्य विभागामार्फत सांगितले.
झिका रुग्णाला चिकणगुणीया
बेलसर गावातील एका पन्नास वर्षाच्या महिलेस विषाणु आजाराची बाधा झाल्याचा निष्कर्ष दिनांक ३० जुलै २०२१ रोजी प्रयोगशाळेने दिला आहे. हा महाराष्ट्रामध्ये आढळलेला पहिला झिका रुग्ण आहे. रुग्ण चिकनगुनिया बाधित देखील असल्याचे स्पष्ट झाल्याने हा मिश्र विषाणू संसर्ग असल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.
आज दिनांक ३१ जुलै रोजी राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ.प्रदीप आवटे, सहाय्यक संचालक, हत्तीरोग डॉ. कमलापुरकर, राज्य कीटकशास्त्रज्ञ डॉ.महेंद्र जगताप या राज्यस्तरीय शीघ्र प्रतिसाद पथकाने बेलसर गावास भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. पथकाने सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य, प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी,पुरंदर तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांची तातडीची बैठक घेऊन त्यांना या भागात झिका रुग्ण आढळल्याने करावयाच्या कार्यवाही बाबत सूचना दिल्या.
काय आहे झिका आजार?
झिका विषाणू आजार हा एडिस इजिप्ती डासांमुळे होणारा सौम्य स्वरुपाचा आजार असून या आजारात ८० टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून येत नाहीत. इतर रुग्णांमध्ये ताप, अंगदुखी, डोळे येणे, अंगावर पुरळ उठणे, सांधेदुखी अशी लक्षणे आढळतात. झिका आणि इतर कीटकजन्य आजारासाठी सर्वेक्षण सक्षम करत असतानाच कोरोना सर्वेक्षण आणि लसीकरण याकडे दुर्लक्ष होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याबाबत सर्व संबंधितांना आरोग्य विभागाने निर्देश दिले आहेत.
हेही वाचा -चोर के दाढी में तिनका; नाना पटोलेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नाव न घेता टीका