जालना - येथील सामान्य रुग्णालयातून चोरी गेलेल्या दोन रेमडेसिवीर इंजेक्शन प्रकरणी पोलिसांनी चौकशी केली. यामध्ये एकूण आठ जणांची चौकशी करण्यात आल्याची माहिती कदीम पोलिसांनी दिली.
सामान्य रुग्णालयाच्या कोविड हॉस्पिटलमधून काल दुपारी २ रेमडेसिवीर इंजेक्शन चोरी गेल्याची घटना घडली होती. त्या प्रकरणी रिमा निर्मळ या परिचारिकेने कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार दोखल केली होती. त्यानंतर रात्री साडेदहा वाजता गुन्हा दाखल झाला. दरम्यान हा गुन्हा दाखल होत असतानाच दोन्ही इंजेक्शन सापडल्याचे निष्पन्न झाले. आता इंजेक्शन सापडले आहेत. मात्र, हे इंजेक्शन चोरीला गेले कसे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याचा तपास आता पोलीस करत आहेत. कदीम जालना पोलिसांनी आज येथील सविता पाटोळे, प्रतीक्षा अवचार, सीमा ठाकुरी, रिमा निर्मळ या परिचारिकांची चौकशी केली. तर, अजय सोनवणे, अरुण भोंडे, योगेश मस्के, आशा वाकडे, या सफाई कामगारांचीही चौकशी करण्यात आली. आज सकाळी दहा वाजल्यापासून सुरू असलेली ही चौकशी संध्याकाळी आठ वाजेपर्यंत चालू होती.