जालना -चंदंनजिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास गाय वासरांची चोरी झाली. ही चोरी थांबविण्याचा प्रयत्न करीत असताना वाहन चालकाने पशुमालकाच्या अंगावर वाहन घालून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने तो वाचला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तत्परतेने गाडीचा पाठलाग करून औरंगाबाद येथून गाय वासरासह वाहनचालकाला ताब्यात घेतले आहे.
स्कार्पिओमधून गाय-वासराची चोरी; औरंगाबादेत पकडले चोर मोंढा रोडवरील घटना नवीन- मोंढा रस्त्यावर योगेश रमेश भगत यांचा पशुपालनाचा व्यवसाय आहे. 11 गाई आणि 35 म्हशी आहेत. त्यांच्यासोबतच त्यांचा चुलतभाऊ मदनलाल भगत यांच्या देखील 30 गाई आणि 15 म्हशी आहेत. रस्त्याच्या जवळच असलेल्या त्यांच्या या व्यवसायाच्या ठिकाणाहून आज सकाळी एक गाय एक गोऱ्हा आणि एक कालवड, अशा तीन जनावरांची चोरी झाली. पहाटे पाच वाजेच्या सुमारास ही जनावरे एका स्कार्पिओ गाडीत भरत असताना दिलीप कोरवी यांनी पाहिले. त्यांनी पळत येऊन योगेश भगत यांना ही माहिती दिली. त्याच वेळी दोघांनी रस्त्यावर येऊन या स्कार्पिओला अडविण्याचा प्रयत्न केला असता त्याने हे वाहन दिलीप कोरवी आणि योगेश भगत यांच्या अंगावर घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला. स्कार्पिओमधून गाय-वासराची चोरी; औरंगाबादेत पकडले चोर स्थानिक गुन्हे शाखेची तत्परता- ही माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळताच त्यांनी तत्परता दाखवत खासगी वाहनांनी या स्कार्पिओचा पाठलाग केला. त्यावेळी हे वाहन औरंगाबादकडे जात असल्याचे लक्षात आले. त्यानुसार या वाहनाचा पाठलाग करत असताना औरंगाबाद येथील अमरप्रीत हॉटेल, काल्डा कॉर्नर, उस्मानपुरा, स्मशानभूमी मार्गे जागृत हनुमान मंदिर प्रतापनगर येथे येथील मोकळ्या जागेत जाऊन थांबले. गाडी तिथेच सोडून एक आरोपी पळतांना पोलिसांच्या हाती लागला. त्याची चौकशी करून पोलिसांनी अधिक माहिती विचारली असता शेख समीर शेख शाकीर उर्फ कुरेशी (वय 46 राहणार शम्सनगर शहानुर वाडी, औरंगाबाद), अशी माहिती दिली. दरम्यान पोलिसांनी शेख समीर शेख शाकिरी याला पकडून जालना येथे आणले आहे. तसेच स्कार्पिओ मधील गाय वासरांना दुसऱ्या वाहनात भरून जालन्यात आणले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक शिवाजी नागवे, भाऊराव गायके, अमोल कांबळे, कृष्णा तगे, सचिन चौधरी, किशोर पुंगळे, किरण मोरे, आदींनी ही कारवाई केली.
चंदंनजिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल-
चंदंनजिरा पोलीस ठाण्यामध्ये सकाळी सात वाजेच्या सुमारास योगेश रमेश भगत यांनी गाय चोरीला गेल्याची तक्रार दिली आहे. तसेच स्कार्पिओमध्ये ही जनावरे भरून जात असल्याचे सांगितले आहे. त्यामध्ये 30 हजार रुपयांची एक गाय 15 हजार रुपयांचा एक गोऱ्हा आणि पंधरा हजार रुपयांची एक कालवड, अशी तीन जनावरे आहेत. याची किंमत 60 हजार रुपये असल्याचे नमूद केले आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले यांनी घटनास्थळाची पाहणी करून पुढील तपास सुरू केला आहे.
हेही वाचा-'आई मला माफ कर, तुझी लाडकी...' पत्र लिहून क्लासवन महिला अधिकाऱ्याची आत्महत्या