जालना- जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे या परिसरात असलेली धरणे पूर्णपणे भरण्याच्या मार्गावर असून नदीला आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
भोकरदन तालुक्यात पावसाने जनजीवन विस्कळीत; धरणे पूर्णपणे भरण्याच्या मार्गावर - नदी
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये नदीचे पाणी घुसले तर अनेक गावांचा संपर्क तुटला.
रायघोळ नदीला मागील १० दिवसात पाचव्यांदा शनिवारी पुन्हा पूर आला आणि नदी दुथडी भरून वाहिली. त्याचा परिणाम पारध गावावर झाला. नदीचे पाणी गावात घुसल्यामुळे शाळा, पोलीस ठाणे आणि अनेकांच्या घरांमध्ये हे पाणी गेले. एवढेच नव्हे तर मराठवाडा आणि विदर्भला जोडणाऱ्या नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे या भागाचाही संपर्क तुटला. या पाण्यामुळे अद्यापपर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, ग्रामस्थांच्या घरात पाणी घुसल्यामुळे जनजीवनावर विपरीत परिणाम झाला आहे.
जुई धरणामध्ये १३ फूट पाणीसाठा झाला आहे. पाण्याची आवक अजूनही सुरूच असून या धरणावरुन २१ गावांना पाणीपुरवठा केला जातो. त्याचसोबत सेलूद येथील धामना मध्यम प्रकल्पही भरण्याच्या स्थितीत आहे. तो पूर्ण भरण्यासाठी ३ फूट पाण्याची आवश्यकता असून पाण्याची आवक सुरूच आहे. येत्या ४-५ दिवसात हा प्रकल्पही पूर्ण भरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भोकरदन तालुक्यातील नद्यांना आलेल्या पुरामुळे पारध, रेणुकाई पिंपळगाव भागातील गावांचा भोकरदन तालुक्याशी संपर्क तुटला होता.