जालना- येत्या 14 मार्चला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा पूर्व परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातील 2 हजार 442 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत आणि या परीक्षेसंदर्भात आज (दि. 4) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
जालना जिल्ह्यात 2 हजार 442 विद्यार्थी देणार 'एमपीएससी'ची पूर्व परीक्षा आठ परीक्षा केंद्र
जालना शहरात राज्यसेवा पूर्व परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी आठ परीक्षा केंद्र आहेत. त्यामध्ये शासकीय तंत्रनिकेतन नागेवाडी, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय औद्योगिक वसाहत, श्री सरस्वती भुवन हायस्कूल जुना जालना, सी.टी.एम.के. गुजराती विद्यालय नवीन जालना, महावीर स्थानकवासी जैन इंग्रजी शाळा, सेंट मेरी हायस्कूल देऊळगाव राजा रोड, जे.ई.एस. महाविद्यालय आणि महावीर स्थानकवासी मराठी माध्यम शाळा या आठ परीक्षा केंद्रांच्या माध्यमातून 2 हजार 442 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
दोन सत्रामध्ये परीक्षा
14 मार्चला सकाळी 10 ते 12 आणि 3 ते 5 या दोन सत्रांमध्ये ही परीक्षा होणार आहेत. दरम्यान, सकाळच्या सत्रात साडेआठ ते साडेनऊ या वेळेत तर दुपारी दीड ते अडीच या वेळेतच उमेदवारांना परीक्षा केंद्रात सोडण्यात येणार आहे. कोरोना संदर्भात शासनाने घालून दिलेले सर्व नियम पाळत ही परीक्षा होणार आहे. त्यासाठी लागणारे सॅनिटायझर, पी. पी. किट, मास्क हे सर्व साहित्य जिल्हाधिकारी कार्यालयात यापूर्वीच आलेले आहे.
अशी आहे परीक्षा केंद्राची रचना
उपकेंद्र प्रमुख - एक, उपकेंद्र प्रमुख सहायक - 2, पर्यवेक्षक - तीन, सर्वेक्षक - 12, चतुर्थ श्रेणी कर्मचारी - चार, असे कर्मचारी प्रत्येक केंद्रावर नियुक्त करण्यात आले आहेत. आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात या सर्व कर्मचाऱ्यांना परीक्षेबाबत प्रशिक्षण देण्यात आले.
हेही वाचा -बदनापूर तालुक्यात अफूची शेती; पोलिसांच्या छाप्यात 20 लाखांचे पीक जप्त