जालना - परतूर तालुक्यातील अलंकार ज्वेलर्सवर दरोडेखोरांनी मागील महिन्यात दुपारी तीन वाजताच्या सुमारास सशस्त्रस दरोडा टाकला होता. तसेच इतरही ठिकाणी अशा घटना घडल्या होत्या. जालना पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकत या दरोडेखोरांच्या टोळीचा छडा लावला आहे. यात तीन दरोडेखोरांना अटक केलेली आहे.
परतूर तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या अलंकार ज्वेलर्स या सोन्या-चांदीच्या दुकानावर दिनांक 23 मे 2019 रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास दरोडेखोरांनी सशस्त्रसह दरोडा टाकला होता. याप्रकरणी परतूर पोलीस ठाण्यात गुन्हाची नोंद झाली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक एस. चैतन्य आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र सिंह गौर यांच्यासह घटनास्थळाला भेट दिली. तसेच स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सिंह गौर यांना या गुन्ह्याचा छडा लावण्याचेही सूचित केले होते.
राजेंद्र सिंह गौर यांनी घटनास्थळाची पाहणी करून आणि गुन्हेगारांची पद्धत लक्षात घेऊन अशा प्रकारचे गुन्हे मुंबई भागात झाल्याचे लक्षात आले. त्यानुसार त्यांनी विविध पथके स्थापन करून या गुन्हेगारांची माहिती मिळवली. त्यातील एका पथकाला नवी मुंबई येथे पाठविण्यात आले. सदरील परिसरात माहिती घेतल्यानंतर गौर हे त्यांच्या पथकासह ठाणे, चेंबूर व मुंबई येथे विविध पोलिस अधिकाऱ्यांची मदत घेऊन या प्रकरणातील आरोपींची तपासणी करू लागले. तपासणी करीत असताना या गुन्ह्यातील एक आरोपी महेंद्र सभापती मिश्रा (वय 52, राहणार के.के. दीक्षित चाळ, परबत नगर, दहिसर पूर्व मुंबई) याला ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केल्यानंतर त्याने त्यांचा टोळीप्रमुख मनोज भार्गव इजवा उर्फ जीवा (वय 50 ,राहणार कोपरखैरणे, नवी मुंबई) हा मूळचा केरळ राज्यातील आहे. त्याचसोबत त्याचा सहकारी लोकेश सिना शेट्टी (वय 44 वर्ष राहणार नीलकमल मंगल नावडे कळंबोली रोड ,जिल्हा रायगड) यांच्या व इतर साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली.