जालना -भिवंडी आणि ठाणे जिल्ह्यात यशस्वी ठरलेला 'टेलीमेडीसीन आयसीयू' हा उपक्रम राज्यभर राबविण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ते आज (सोमवार) जालनामध्ये बोलत होते. त्यांनी या प्रयोगामुळे मृत्यूदर कमी होईल, अशी खात्री यावेळी व्यक्त केली.
राजेश टोपे म्हणाले की, प्रत्येक ठिकाणी विशेष तज्ज्ञ मिळतीलच असे नाही. त्यामुळे भिवंडी आणि ठाणे येथे टेलीमेडीसीन आयसीयू ही सेवा राबविली होती आणि ती यशस्वीही झाली आहे. या सेवेच्या माध्यमातून दिल्ली आणि अन्य ठिकाणी असलेले तज्ज्ञ डॉक्टर्स व्हिडिओच्या माध्यमातून संबंधित रुग्णाची तपासणी करणार आहेत. या उपक्रमाचे पहिल्या टप्प्यामध्ये गुरुवारी जालना, औरंगाबाद, जळगाव, सोलापूर, अकोला, या पाच जिल्ह्यांमध्ये उद्घाटन होणार आहे.
सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला जाणार आहे. यानंतर राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये हा प्रयोग राबविण्यात येणार आहे आणि त्या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बोलणे झाले असल्याचेही टोपे यांनी सांगितलं.