जालना- पाच महिन्यापासून थकलेले मानधन मिळावे यासाठी उपोषणाला बसण्याच्या तयारीत असलेल्या मानव विकास मिशनच्या शिक्षिकांना डोळ्यात पाणी साठवूनच जिल्हाधिकारी कार्यालयातून परत फिरावे लागले.
जालना जिल्हा परिषदेंतर्गत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय चालवले जाते. या विद्यालयामध्ये सहावी ते आठवी हे केंद्र शासनामार्फत, तर नववी ते दहावी हे दोन वर्ग मानव विकास मिशन अंतर्गत चालवल्या जातात. नववा व दहावा वर्ग शिकवणाऱ्या जालना जिल्ह्यातील १५ शिक्षिकांना जून महिन्यापासून मानधन मिळाले नाही. त्यामुळे, या शिक्षिकांच्या परिवारावर उपासमारीची वेळ आली आहे. वारंवार मागणी करूनही मानधन मिळत नाही. त्यामुळे, शिक्षिकांनी मानव विकास मिशनच्या सचिव तथा जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे वारंवार मानधनाची मागणी केली. तरीदेखील त्याचा उपयोग झाला नाही. त्यामुळे, मिशनचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांना निवेदन देऊन उपोषणाला बसण्यासाठी या शिक्षका आज सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाल्या होत्या.
शिक्षिकांनी निवासी उपजिल्हाधिकार्यांना निवेदन सादर केले आणि त्यानंतर उपोषण म्हणून त्या याच परिसरात ठाण मांडून बसल्या. मात्र, प्रशासनाला या उपोषणाबद्दल कोणतीही माहिती किंवा पूर्वसूचना दिलेली नव्हती. त्यामुळे, जिल्हा प्रशासनाने या महिला निवेदन देण्यासाठी आल्या होत्या हे गृहीत धरून त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, सायंकाळी सात वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी देखील कार्यालयातून घरी निघाले आणि त्यानंतर या महिलांच्या लक्षात आले की आपण उपोषणाला बसण्याचा इशाराच दिलेला नाही. त्यामुळे, आज जरी उपोषण केले तरी देखील आपल्याकडे कोणीही लक्ष देणार नाही. ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यांच्या भावना ईटीव्हीला बोलून दाखवल्या. यावेळी आपल्या व्यथा सांगताना शिक्षिकांना आपले अश्रू आवारता आले नाही.