जालना - सरकारने कोट्यवधी रुपये खर्चून वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट यावर्षी ठेवलेले होते. त्यानुसार जालना जिल्ह्यात मोठा कार्यक्रम घेऊन वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी याचा गाजावाजा केला. मात्र, केवळ कागदोपत्री घोडे नाचवणाऱ्या वनविभागाने दिलेले उद्दिष्ट वेळेत केले आहे, असे सांगत आहे. जालना जिल्ह्याला जुलै ते ३० सप्टेंबर पर्यंत १ कोटी ५ लाख वृक्ष लागवडीचे वनविभागाला उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, या पैकी किती वृक्षांची लागवड केली याची कोणतीही खात्री केली नाही. एकदा रोपे दिली की त्यांची जबाबदारी संपली, असा त्यांचा समज आहे. बदनापूर तहसील कार्यालयाच्या परिसरात तहसीलदारांच्या दुर्लक्षामुळे शेकडो रोपे लागवडी अभावी जळाली आहे. त्यामुळे ज्या योजनेत निधी मिळत नाही, अशा योजना हे अधिकारी कशा पद्धतीने फोल राबवितात त्याचे हे एक ज्वलंत उदाहरण आहे.
बदनापूरमध्ये सरकारच्या वृक्ष लागवड योजनेला तहसीलदारांकडून हरताळ - वृक्ष लागवड योजनेला तहसीलदारांकडून हरताळ
जालना जिल्ह्याला जुलै ते ३० सप्टेंबर पर्यंत १ कोटी ५ लाख वृक्ष लागवडीचे वनविभागाला उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, या पैकी किती वृक्षांची लागवड केली याची कोणतीही खात्री केली नाही.
हेही वाचा -राष्ट्रवादीचे आमदार पवईतील रेनिन्सन हॉटेलमध्ये मुक्कामी
बदनापूरच्या तहसीलदार छाया पवार यांना तहसील परिसरात वृक्ष लागवडीसाठी हजारो रोपे देण्यात आली होती. ही रोपे लावण्यासाठी तहसीलचे भव्य प्रांगण देखील आहे. या प्रांगणात काही ठिकाणी या वृक्षाची लागवड ही करण्यात आली आहे. दर्शनी भागात दिखाव्यासाठी ही रोपे लावली असून याची देखभाल केल्याची छायाचित्रे काढून प्रसिद्धी माध्यमात दाखविण्याचाही प्रयत्न केला गेला. मात्र, तहसील परिसरात असलेली प्रचंड मोकळी जागा लक्षात घेता इतर भागातही वृक्ष लागवड करणे अपेक्षित होते. परंतू हजारो रोपे अद्यापही वाहनांच्या चाकाखाली आणि नागरिकांच्या पायदळी तुडवली जात आहेत. त्यामुळे या सर्व प्रकाराकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आणि उदासीनता आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेला खोटे ठरविणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.