जालना- तत्कालीन पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यावर न्यायालयाच्या आदेशान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी हॉटेल व्यावसायिकाने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलीस ठाण्याच्या आवारातच या व्यावसायिकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. संजय रामभाऊ राऊत, असे या आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील औरंगाबाद रस्त्यावर हॉटेल आदर्श पॅलेस आहे. हे हॉटेल सोनल संजय राऊत यांच्या नावावर आहे. हा सर्व व्यवसाय संजय राऊत व मुलगा करण राऊत यांना मुखत्यारपत्र दिले आहे. या ठिकाणी 5 मे 2015 ला रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास काही पोलीस आले. त्यांनी या हॉटेलमधून 2 पाण्याच्या बाटल्या घेतल्या. त्यानंतर हॉटेल मालकाने पोलिसांना या पाण्याच्या बाटल्यांचे पैसे मागितले. त्यामुळे पैसे मागितल्याच्या रागातून पोलिसांनी वाद घातला. हा सर्व प्रकार पोलीस उपविभागीय अधिकारी दीक्षित गेडाम यांच्या उपस्थितीत झाला होता. पोलिसांनी राऊत आणि हॉटेलमधील कामगारांना शिवीगाळ आणि मारहाण करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. त्यानंतर तीन दिवसांत त्यांची जामीनावर सुटका झाली.
हेही वाचा - स्तुत्य उपक्रम, तेराव्याचे पैसे शाळेच्या पाणी पुरवठ्यावर खर्च
त्यावेळी संजय राऊत यांनी चंदनझिरा पोलीस ठाण्यापासून ते पोलीस महासंचालक मुंबई यांच्याशी पत्रव्यवहार करून आपल्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याची तक्रार नोंदवली. मात्र, पोलिसांवर काहीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे राऊत यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. या याचिकेवर 5 ऑक्टोबर 2015 ला सुनावणी झाली. त्यावेळी राऊत यांनी जालन्याच्या मुख्य न्यायदंडाधिकरी यांच्या न्यायालयात तक्रार दाखल केली. यावर 10 डिसेंबर 2019 ला निकाल लागला. यावेळी न्यायालयाने दीक्षित गेडाम यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश चंदनझिरा पोलिस ठाण्याला दिले. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली.