जालना - राज्य सरकारच्या ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत काम करणाऱ्या 54 महिला प्रशिक्षिकांचे ऑगस्ट महिन्याचे मानधन थकीत आहे. स्वखर्चाने ग्रामीण भागात राहून या प्रशिक्षिका(वर्धिनी) बचत गटांसंदर्भात जनजागृतीचे काम करतात. मात्र, मानधन न मिळाल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढावले आहे.
ग्रामीण भागातील जनतेची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी बचत गट स्थापन करून त्याअंतर्गत विविध उपक्रम राबवले जातात. यासाठी राज्य सरकारने 'महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान' सुरू केले आहे. या अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतलेल्या महिला ग्रामीण भागामध्ये बचत गटांची उभारणी करणे, त्यांचे महत्त्व पटवून देणे आणि प्रत्यक्षात कामकाजाला सुरुवात करायला लावणे, अशा पद्धतीचे काम करतात. संबंधित जिल्हा परिषदेने ठरवून दिलेल्या गावांमध्येच निवास करून हे काम करावे लागते. त्यांना महिन्याला 20 ते 21 हजार रुपये मानधन मिळते. ऑगस्ट महिन्यात हिंगोली जिल्ह्यात काम केलेल्या 54 महिलांना आत्तापर्यंत मानधन मिळालेले नाही.