जालना - सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या दुर्लक्षामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागातील कर्मचाऱ्याला आज विजेचा झटका बसला. या कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला या संदर्भात वारंवार पत्रव्यवहार करूनही केवळ थातूरमातूर दुरुस्ती करण्यात आली. या कार्यालयात काम करणारे वाहनचालक विलास अंभोरे यांना आज संगणक बंद करताना विजेचा झटका सहन करावा लागला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांचे कार्यालय आहे. पावसाळा सुरू होताच पहिल्या पावसात या कार्यालयात पाणी साचले. त्यामुळे अधीक्षक सुधाकर कदम यांनी तातडीने हालचाल करत 19 जून रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना लेखी पत्र दिले. या पत्राच्या आधारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी येऊन दोन दिवस थातूरमातूर दुरूस्ती करून गेले. मात्र, त्यानंतर आलेल्या पावसाचे पाणी पुन्हा कार्यालयात आले. उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाच्या काचा फुटल्या असून भिंतींनाही भेगा पडल्या आहेत. यामधून मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी कार्यालयात येते.