जालना - वाघ्रुळ हे गाव मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर वसलेले डोंगराच्या कुशीत वसले आहे. जगदंबा देवीच्या वास्तव्यामुळे हे गाव सर्वदूर परिचित आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारात जाईपर्यंत हे मंदिर दिसत नाही. तसेच या ठिकाणी जाण्यासाठी गावाला आणि डोंगराला वेढा घालून जावे लागते. अशा वातावरणातून मंदिरात गेल्यानंतर मंदिराची सुंदरता आणि दिव्यता पाहून मन प्रसन्न होतं; आणि थकवा निघून जातो.
वाघ्रुळ देवस्थान : तुळजाभवानी आणि रेणुकामाता एकाच गाभार्यात असलेलं राज्यातील एकमेव मंदिर... तुळजापूरची तुळजाभवानी आणि माहुरगडची रेणुका माता या दोघी एकाच ठिकाणी असलेलं जगदंबेचं हे महाराष्ट्रातील एकमेव मंदिर आहे. एकाच गाभाऱ्यात भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी या देवींच्या मूर्ती उभ्या आहेत. सुमारे चारशे वर्षांपूर्वीचे हे मंदिर आता मात्र पूर्ण कात टाकून नवतेज घेऊन उभे आहे. मात्र, दीपमालेच्या माध्यमातून आजही हे हेमाडपंथी असल्याचे कळते.
तुळजापूरची तुळजाभवानी आणि माहुरगडची रेणुका माता या दोघी एकाच ठिकाणी असलेलं जगदंबेचं जालन्यात मंदिर आहे. मंदिराजवळ गेल्यानंतर परिसरात दिसणारी हिरवीगार झाडांची गर्दी आणि प्रवेशद्वारात गेल्यानंतर भव्यदिव्य प्रांगण पाहून देवीच्या दर्शनाची उत्सुकता आणखी वाढवते. मंदिरात प्रवेश केल्यानंतर आकर्षक रंगरंगोटी विलोभनीय विद्युत रोषणाई आणि शांत परिसर मन मोहून टाकतो. पर्यटन क्षेत्राचा "ब"दर्जा असलेले हे देवस्थान दिवसेंदिवस विकासाच्या दिशेने पाऊल टाकत आहे.
गावकऱ्यांच्या सुखदुःखातही मंदिर समिती नेहमीच सहभागी होत असते. त्यामुळे नाममात्र शुल्कामध्ये देवीच्या दरबारात शुभकार्य पार पडतात. बारा महिने मंदिर परिसरात उत्सव पार पडतात. यासाठी पंचक्रोशीतील भाविकांची गर्दी होते. गर्दीत दर्शन घेणे शक्य नसल्यास मुख दर्शनाची सोय या ठिकाणी करण्यात आली आहे. मंदिराच्या वरच्या मजल्यावरून भाविकांना देवीचे मुखदर्शन मिळते.
यंदा महामारीमुळे या देवीची यात्रा भरणार नाहीय. मात्र मंदिराच्या भव्यदिव्य प्रांगणात सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून दर्शन देण्याची मागणी काही भाविकांनी केली होती. त्यामुळे यंदा भाविकांना यात्रा उत्सवाचा आनंद घेता येणार नसला, तरीही देवीचे आशीर्वाद घेण्यापासून त्यांना दूर रहावे लागणार नसल्याचा विश्वास व्यवस्थापन समितीने व्यक्त केला आहे.