जालना -बदनापूर तालुक्यातील सोमठाण येथील डोंगरावर रेणुका मातेचं पुरातन मंदिर आहे. मंदिराच्या पायथ्यालाच दुधना प्रकल्प असल्यामुळे भक्त येथे दर्शनासोबतच पर्यटनाचा देखील आनंद घेतात. त्यातच आता या डोंगराच्या पायथ्याला स्पर्श करून जाणारा समृद्धी महामार्ग मंदिराच्या वैभवात भर घालतो.
मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी आता चांगला रस्ताही झाला आहे. त्यामुळे आबालवृद्ध देखील विनासायास देवीच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचू शकतात. ज्येष्ठ नागरिकांना गाभार्यापर्यंत जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था आहे. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद आहे. त्यामुळे या व्यवस्थांचा तूर्तास काहीच उपयोग नाही. तरीही भाविकांचा देवीकडे येण्याचा ओढा कमी झालेला नाही. मंदिराचे प्रवेशद्वार बंद असतानाही दुरूनच देवीचे दर्शन घेऊन भाविक दरबारात हजेरी लावत आहेत.
मंदिर प्रशासनाने भाविकांसाठी सर्व व्यवस्था केली आहे. रेणुका देवीचा भव्यदिव्य आणि तेजस्वी तांदळा पाहून भाविकांचे समाधान होते. निसर्गाच्या कुशीत वसलेलं डोंगरावरील हे मंदिर निसर्गरम्य वातावरणात भाविकांचे मन मोहून टाकते. एका बाजूने डोंगर चढण्यासाठी केलेल्या पायऱ्या आणि दुसऱ्या बाजूने वाहने जाण्यासाठी केलेला रस्ता यामुळे भाविकांची येथे गैरसोय होत नाही. पर्यटन स्थळाचा दर्जा असलेल्या मंदिर परिसरात आता लहान मुलांसाठी बगीच्या देखील तयार केला आहे. त्यासोबत इथे शुभकार्याला देखील परवानगी दिली जाते. त्यामुळे हळूहळू मंदिराचा विकास गती घेत आहे.
सोमठाणचे रेणुका माता मंदिर बंदच...मात्र भाविकांची दरबारात हजेरी दर्शन घेऊन डोंगर उतरताना त्याच्या पायथ्याशी असलेल्या दुधना प्रकल्पाच्या सांडव्याखाली फेसाळणारं पाणी वाहत असतं. या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी देखील भाविकांचे पर्यटकांमध्ये रुपांतर होते.
मंदिर प्रशासनाने भाविकांसाठी सर्व व्यवस्था केली आहे. सभामंडप भागवत कीर्तनासाठी विशेष व्यवस्था आणि भव्यदिव्य गाभार्यात ब्रह्मवृंद्यांसाठी पूजा पाठ आणि यज्ञ करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था अशा सर्व व्यवस्था या मंदिरात आहेत. मात्र महामारीमुळे कायद्याचे पालन करत आणि सुरक्षित अंतर ठेऊनच सध्या हे सर्व कार्यक्रम पार पडत आहेत. मंदिराची व्यवस्था पाहण्यासाठी विश्वस्त समिती कार्यरत आहे.