जालना- शहरात सामान्य रुग्णालयाच्या समोर असलेल्या इमारतीमध्ये दीडशे खाटांची क्षमता असलेले कोरोना रुग्णालय उद्या (दि. 9 एप्रिल) पासून सुरू होणार असल्याची माहिती जालन्याचे पालकमंत्री आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. मुंबईतून जालन्यातील पत्रकारांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी संपर्क साधला.
जालन्यात उद्यापासून सुरू होणार विशेष कोरोना रुग्णालय - corona update jalana
सामान्य रुग्णालयाच्या समोर असलेल्या इमारतीमध्ये दीडशे खाटांची क्षमता असलेले कोरोना रुग्णालय उद्या (दि. 9 एप्रिल) पासून सुरू होणार असल्याची माहिती जालन्याचे पालकमंत्री आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
यावेळी कोरोना संदर्भात माहिती देताना राजेश टोपे म्हणाले की, जालना जिल्ह्यासाठी 'जॉन्सन अॅण्ड जॉन्सन' कंपनीमार्फत 2 हजार पी.पी किट तसेच दोन लाख तीन पदरी मास्कही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक गावांमध्ये व शहरामध्ये सोडियम हायपोक्लोराईड या द्रव्यांची फवारणी करून निर्जंतुकीकरण करून घेण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. तसेच प्रत्येक ग्रामपंचायतींना सॅनिटायझर, मास्क आणि कोरोना विषाणू संदर्भातील होणाऱ्या प्रादुर्भावापासून रोखण्यासाठी माहिती पुस्तिका असलेल्या किटचे वाटप करण्यात येणार आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये कोणतीही शिधापत्रिका असली तरी त्यांना स्वस्त धान्य दिले जाणार आहे. ज्यांच्याकडे ही शिधापत्रिका नाही, अशा व्यक्तींना शिवभोजन योजनेच्या माध्यमातून पाच रुपयांमध्ये भोजन उपलब्ध करून देण्यात येत आहे. जालना जिल्ह्यामध्ये सध्या आठशे भोजन केंद्र आहेत आणि ही संख्या वाढविण्याचीही तयारी प्रशासन करीत आहे.
जिल्ह्यात कोरोनामुळे जालना शहरातील दुखीनगर भागात राहणारी एक महिला बाधित झाली होती. तिच्या संपर्कात आलेल्या 61 व्यक्तींपैकी 44 व्यक्तींचे नमुने घेण्यात आले होते, हे सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत.