जालना - परराज्यातील कामगारांना सोडण्यासाठी जालना जिल्ह्यातून आज बिहारकडे तिसरी श्रमिक रेल्वे रवाना झाली. शासन दरबारी एकूण तीन हजार आठ बिहारी नागरिकांची नोंद होती. त्यापैकी 1, 608 कामगार या रेल्वेने जाऊ शकतील, असे नियोजन प्रशासनाने केले होते. मात्र प्रत्यक्षात रेल्वे 859 म्हणजेच अर्धीच रेल्वे बिहारी कामगारांना घेऊन रवाना झाली आहे.
बिहारी कामगारांना घेऊन जाणारी रेल्वे निम्मी रिकामीच - स्थलांतरित कामगार न्यूज
शासन दरबारी एकूण तीन हजार आठ बिहारी नागरिकांची नोंद होती. त्यापैकी 1, 608 कामगार या रेल्वेने जाऊ शकतील, असे नियोजन प्रशासनाने केले होते. मात्र प्रत्यक्षात या रेल्वेने 859 म्हणजेच अर्धीच रेल्वे बिहारी कामगारांना घेऊन रवाना झाली आहे.
बिहारी कामगारांचा 13 सेवाभावी संस्थेच्या वतीने शोध घेण्यात आला होता. त्यानुसार काल सुमारे 1100 कामगारांनी रेल्वेने जाण्यासाठी संमती दर्शविली होती. मात्र, आज प्रत्यक्षात 859 कामगार स्थानकात आले. त्यामुळे कुठेतरी प्रशासनामध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे दिसून आले आहे. विविध सेवाभावी संस्थांच्या वतीने या कामगारांना प्रवासादरम्यान खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानुसार सुमारे सोळाशे कामगारांसाठी फूड पॅकेट, पाणी बॉटल, केळी, अशा खाद्यपदार्थांचे नियोजन करण्यात आले होते. मात्र अर्धेच कामगार आल्याने हे सर्व अन्नसंस्थांना परत घेऊन जावे लागले.
स्थानकात आल्यानंतर जालना जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने या कामगारांना मास्क वाटप करण्यात आले. त्यासोबत रेल्वेत बसण्यापूर्वी या कामगारांची आरोग्य तपासणीही करण्यात आली आहे. या सर्व तपासण्यांनंतर 859 कामगारांना घेऊन सायंकाळी 03:56 रेल्वे बिहारच्या दिशेने रवाना झाली. प्रशासनाच्यावतीने कामगार अधिकारी कराड, नायब तहसीलदार दिलीप सोनवणे, पोलीस प्रशासनाचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश भाले, मनोज देशमुख, गणेश चौधरी, श्याम शिरसाठ, अनिल कुर्हे, ज्योती आडेकर, विद्या जाधव, दत्त पवार, रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक त्रिपाठी यांच्यासह अन्य अधिकारीदेखील उपस्थित होते.