जालना- जिल्ह्यामध्ये 99.82% पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. चार दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे पिकांना जीवनदान मिळाले आहे. त्यामुळे सद्यपरिस्थितीत पिकांची परिस्थिती चांगली आहे. मात्र, एवढ्या पावसावर भागणार नसून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी अजूनही पावसाची आवश्यकता आहे, असे मत तालुका कृषी अधिकारी ए .टी. सुखदेवे यांनी केले आहे.
तालुका कृषि अधिकारी ए .टी .सुखदेवे सद्य परिस्थितीत पिकांची वाढ चांगल्या प्रमाणात होत आहे. त्यासोबत आता ऊन पडल्यानंतर पिकावर विविध प्रकारचे रोगही पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेताना महागडी औषधे न वापरता स्वस्त, परिणामकारक औषधे वापरून खर्च कमी करावा आणि उत्पादन वाढवावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी ए .टी .सुखदेवे यांनी केले आहे. जालना जिल्ह्यामध्ये 5 लाख 87 हजार 245 हेक्टर जमिनीवर पेरणी होणे अपेक्षित होते. त्यापैकी 5 लाख 86 हजार 557 हेक्टरवर पेरणी झाली आहे. सुमारे 99 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. कृषी विभागाने 5 जून पर्यंत बियाणे विक्रीसाठी बंदी घातली होती. त्यामुळे बहुतांश पेरण्या जूनच्या शेवटच्या आठवड्यात झाल्या. उर्वरित पेरण्या जुलैमध्ये झाल्या, त्यामुळे उशिरा पेरणी आणि उशिरा आलेला पाऊस याचा परिणाम आज पीक परिस्थिती चांगली आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकाऱ्यांनी दिली.
सुरु असलेल्या पावसावर पिके चांगली आहेत मात्र पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अजूनही गंभीर आहे. सध्या पडलेला पाऊस हा रिमझिम असल्यामुळे जमिनीमध्ये चांगल्या पद्धतीने मुरला आहे. पुढील आठ दहा दिवस हा पाऊस पिकांना पुरणार आहे. याच काळात पिकांची वाढ ही जोमाने होत असते, त्यामुळे निश्चितच यावर्षीची पीक परिस्थिती आजच्या हवामानावरून चांगली आहे. यावर्षी सोयाबीनच्या क्षेत्रात घट झाली असून नगदी पीक असलेल्या कापसाकडे शेतकऱ्यांनी जास्त लक्ष दिले आहे, अशी माहिती देखील ए .टी .सुखदेवे यांनी दिली.
तालुकानिहाय पेरण्यांची टक्केवारी
जालना 92 %
भोकरदन 101%
जाफराबाद 95%
बदनापूर 107%
अंबड 125 %
घनसावंगी 84 %
परतुर 89 %
मंठा 96 %
जिल्ह्यातील एकूण पेरणी 99 टक्के झाले आहे.