जालना- महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर आणखी काही मंत्री राजीनामा देतील, असे भाकित केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले आहे.
सोमवार (दि. 5) पोलीस दलातील उच्चपदस्थ अधिकारी परमबीर सिंह यांच्या आरोपावरून न्यायालयाने महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना चपराक दिली होती. त्यानंतर गृहमंत्री देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. याबद्दल बोलताना दानवे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना, "महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांनी एकत्र येऊन निवडणूक लढविली, मात्र शिवसेनेने भाजपसोबत दगाफटका केला. जनतेने युती म्हणून त्यांना मतदान केले होते आणि शिवसेनेने जनतेचा विश्वास तोडला. त्यामुळे जनतेचा आता या सरकारवर भरोसा नाही आणि सरकारही जनतेची कामे करत नाही. त्यामुळे आम्ही विषयांमध्ये पडायचे नाही. गृहमंत्र्यांचा राजीनामा हे भाजपचे यश नाही, तर जनतेचा आमच्या वरचा विश्वास हे आमचे यश आहे," असे म्हणत आता तरी दोन मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. भविष्यात अनेक मंत्री राजीनामा देतील, असे भाकीतही खासदार दानवे यांनी केले. मात्र, राजीनामे देणारे मंत्री कोणत्या पक्षाचे असतील याविषयी बोलण्याचे टाळले.