जालना- पंढरपूर हे नाव ऐकल्यानंतर डोळ्यासमोर उभी राहते ती सुंदर, विलोभनीय, काळीसावळी अशी पांडुरंगाची मूर्ती. या मूर्तीचे दर्शन घेणे सर्वांच्याच नशिबी येईल असे नाही. परंतु, पांडुरंगाला सर्वांना दर्शन देण्याची इच्छा मात्र निश्चित आहे, हे अनेकवेळा अनुभवायला मिळते. भक्तांची खरी श्रद्धा पाहून पांडुरंग देखील त्यांच्या हाकेला धावून जातो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. तुम्ही माझ्याकडे येऊ शकत नसाल तर मी तुमच्याकडे येतो, असे म्हणत राज्यात अनेक प्रतिपंढरपूर देवस्थाने निर्माण करून ठेवली आहेत. या मंदिरांमध्ये पांडुरंगच असायला हवा असे काही नाही, अशाच स्वरूपाचे प्रतिपंढरपूर म्हणून जालन्यातील 'आनंदी स्वामी महाराज, पांडुरंगाने भक्तांना दर्शन देण्यासाठी दत्तात्रेयाचा धारण केलेला हा अवतार.
पुराणामध्ये आनंदी स्वामी महाराजांची खूप मोठी अख्यायिका आहे. त्यासंदर्भातील पोथी देखील आहे. या पोथीचे भाविकांनी ५ जुलैपासून पारायन सुरू केले आहे. या पोथीमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे श्री आनंदी स्वामी महाराज हे दत्त अवतार आहेत. शके 1674 (इ.स.1752) भाव नाम संवत्सरात कार्तिक शुद्ध दशमी, गुरुवार दुपारी दिडच्या प्रहरी जालन्यापासून जवळच असलेल्या प्रति गिरी बालाजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री बालाजी महाराजांच्या मंदिरात आनंदी स्वामी प्रगट झाले. या मंदिरात दत्तात्रेयांचा अवतार झाल्यानंतर सर्वत्र आनंदोत्सव सुरू झाला. सर्वत्र आनंदी आनंद असताना दत्तात्रेयांच्या अवताराला नावही "आनंदी" असे ठेवले गेले.
पुढे हेच आनंदी स्वामी महाराज म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यानंतर ते कृष्णसा पटली या भक्ताच्या श्रद्धेपोटी जालन्यात आले. त्यांनी 51 वर्ष येथेच वास्तव्य केले. याच दरम्यान सुमारे अडीचशे वर्षापूर्वी जिंतूर जवळील चारठाणा येथील पांडुरंगाचे भक्त नामदेव पाटीलबा हे पंढरपूरला वारीसाठी जात असत, वारीला जाण्याची तयारी करीत असताना पांडूरंगांनी पाटीलबाला स्वप्नात दर्शन दिले आणि पंढरपूरला न येता जालना (पूर्वीचे जनकपूर)येथे जाऊन आनंदी नाथांचे दर्शन घ्या. आनंदीनाथ आणि पंढरीनाथ हे एकच आहेत तिथेच तुम्ही आषाढी वारी करा असा दृष्टांत दिला. तेव्हापासून पाटीलबा हे जालन्यात यायला लागले.
जालन्यातील प्रतिपंढरपूर; पांडुरंगाच्या अवतारातील दत्तात्रेय, आनंदी स्वामी महाराज स्वामींच्या समाधीनंतर गेल्या अडीचशे वर्षांपासून आजही ही परंपरा इथे सुरू आहे. जुना जालना भागात शनिमंदिर चौकामध्ये आनंदी स्वामी गल्ली या नावाने एक जुनी वसाहतच आहे. या गल्लीमध्ये प्रवेश करतानाच भव्य दिव्य असे आनंदी स्वामी महाराजांचे पुरातन मंदिर आहे. प्रवेशद्वारातून पायऱ्या चढून वर जावे लागते. समोर दिसते ती आनंदी स्वामी महाराजांची मूर्ती. या उत्सवादरम्यान आनंदी स्वामी महाराज विविध रूपांमध्ये पहावयास मिळतात. शंकर पार्वतीचे रूप, पांडुरंगाचे रूप, दत्तात्रयांचे रूप अशा वेगवेगळ्या रूपात आपल्याला आनंदी स्वामी महाराज दिसतात.
पुरातन काळातील हे मंदिर असल्यामुळे देवाच्या पायाजवळ जाऊन दर्शन घेण्यासाठी हौदांमध्ये उतरावे लागते आणि तिथून पादुकांचे दर्शन घेऊन दुसऱ्या दाराने बाहेर जाता येते. जुन्या काळातील लाकडांवर कलाकुसर करून चार मजली असलेले हे भव्यदिव्य असलेले सुंदर मंदिर आलेल्या भाविकांना अचंबित करून टाकते. दरवर्षी आषाढी वारीसाठी येथे भाविक मोठ्या प्रमाणात येतात एकादशीच्या दिवशी सकाळी ७ वाजल्यापासून श्रींच्या पालखीच्या मिरवणुकीला सुरुवात होते. कचेरी रोड, गणपती गल्ली, शास्त्री मोहल्ला, कसबा भागात असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोरून ही पालखी गांधीचमन मार्गे परत रात्री बारा वाजेच्या सुमारास मंदिरामध्ये विसावते. सुमारे 17 तास चाललेला हा पालखी सोहळा पाहण्यासाठी जालना शहरच नव्हे तर पंचक्रोशीतील पांडुरंगाचे भक्त इथे येतात.
पालखी दरम्यान आधुनिक पद्धतीचे वाद्य तर आहेतच. मात्र, पारंपरिक वाद्यांचांही येथे समावेश असतो. पालखीच्या समोर आनंदोत्सव साजरा करताना भक्त मल्लखांब, तलवारबाजी, लाठी फिरवणे, अशा विविध प्रकारच्या खेळांचीही प्रदर्शन करतात त्याच दरम्यान विविध ठिकाणी या वारकऱ्यांचे स्वागतही केले जाते, पालखी मार्ग दरम्यान वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येते आणि या वाहतुकीची जागा पालखीसाठी आणि भाविकांसाठी मोकळी करून दिली जाते. पालखी सोबतच भाविकांना यात्रेचा ही आनंद लुटता यावा म्हणून या रस्त्यांवर विविध खेळण्यांची ही दुकाने थाटली जातात.