जालना -सुरुवातीच्या काळात प्रशासन लसीकरण करून घ्या-घ्या म्हणत टाहो फोडत होते. मात्र, नको त्या अफवांमुळे नागरिकांनी या लसीकरनाकडे पाठ फिरवली होती. आज याच लसीकरण केंद्रांवर प्रचंड गर्दी होत आहे. मात्र, लस उपलब्ध नसल्याने हे केंद्र बंद करण्याची नामुष्की आरोग्य विभागावर आली आहे. लसीकरण केंद्रातच प्रचंड गर्दी होत असल्यामुळे नागरिकांचा इथेच जीव गुदमारायला लागला आहे.
जालन्यात लसीकरणा अभावी गुदमरतोय नागरिकांचा जीव
जालन्यात लसीकरणा अभावी नागरिकांचा जीव गुदमरतो आहे. लस उपलब्ध नसल्याने हे केंद्र बंद करण्याची नामुष्की आरोग्य विभागावर आली आहे.
जालना शहरात गांधीचमन परिसरात स्त्री रुग्णालयात लसीकरण केंद्र सुरू आहे. मंगळवारी 27तारखेला या केंद्रावर 600 लसी उपलब्ध झाल्या होत्या. त्यापैकी साडेचारशे लसी मंगळवारी दिल्या गेल्या आणि आज सकाळपासून पुन्हा या केंद्रावर प्रचंड गर्दी झाली. मात्र, केवळ दीडशेच लसी उपलब्ध असल्याने सुरुवातीच्या लाभार्थ्यांना ही लस मिळाली. उर्वरित लाभार्थ्यांना मात्र जीव मुठीत घेऊन परत फिरावे लागले आहे. या केंद्रावर सकाळी अकरा वाजेपर्यंत सुमारे पाचशे नागरिकांनी लाईन लावली होती. मात्र, डॉक्टरांनी वारंवार सांगून देखील हे नागरिक परत फिरत नसल्यामुळे शेवटी पोलिसांना बोलवावे लागले, त्यानंतर ओरडून-ओरडून ही गर्दी कमी करावी लागली. केवळ दीडशे लाभार्थ्यांना आज लस मिळाली आहे. लस उपलब्ध झाल्यानंतर पुन्हा लसीकरण सुरू केले जाईल अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.