जालना - पारंपरिक पद्धतीने बुधवारी छत्रपती शिवाजी महाराजांची 390 वी जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास गांधी चमन येथून मिरवणुकीला प्रारंभ झाला. यावेळी माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या प्रमुख उपस्थिती होती.
जालन्यात शिवजयंतीचा उत्साह ढोल-ताशांच्या गजरात छत्रपतींची मिरवणूक निघाली. मिरवणूकीत मल्लखांब, लाठ्याकाठ्या फिरवणे, पारंपरिक देवीची वेशभूषा करणारे सोंगडे आणि अश्वारुढ छत्रपतींचा सजीव देखावे सादर करण्यात आले. गांधीचमन मस्तगडमार्गे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याकडे ही मिरवणूक रवाना झाली. दरम्यान, सकाळपासूनच छत्रपतींना पुष्पहार अर्पण करणाऱ्या शिवभक्तांमध्ये उत्साह संचारला होता. पुतळा परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई आणि कारंजी ही चालू केली होती. त्यामुळे हा परिसर खुलून दिसत होता. अनेकांनी छत्रपतींसोबत सेल्फीही घेतला.
हेही वाचा -तृप्ती देसाईंनी 'हिंदू' धर्मात लुडबुड करु नये, करणी सेनेचा इशारा
जयंती सोहळ्यात शिवसेने जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, अंकुश शेठ राऊत, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, अक्षय गोरंट्याल, सिद्धिविनायक मुळे, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपतींना पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शहरातील प्रतिष्ठित नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
भोकरदनमध्येही शिवजयंती उत्साहात साजरा -
जिल्ह्यातील भोकरदन शहरासह तालुक्यातही मोठया उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. भोकरदन शहरात सकाळपासूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी शिवभक्त मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. यावेळी तरुणांनी मोटारसायकलवर भगवे ध्वज लावून गटागटाने भव्य रॅली काढली. तसेच सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर ही घेण्यात आले. यावेळी बहुसंख्य तरुणांनी रक्तदान केले. यावेळी आमदार संतोष दानवे, माजी आमदार चंद्रकांत दानवे, नगराध्यक्षा मंजुषाताई देशमुख, आदी. मोठया संख्येने उपस्थित होते.
भोकरदनमध्येही शिवजयंती उत्साहात साजरा तसेच शिवाजी विद्यालयाच्या वतीने ही शिवजयंती निमित्त शहरातून महापुरुषांच्या व विविध प्रकारच्या वेशभुषा करून भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीत आमदार संतोष दानवे, प्राचार्य विकास वाघ यांच्यासह शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.