जालना - राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक तीनच्या सेवकांच्या सहकारी पतसंस्थेमध्ये सचिवाने 37 लाखांचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. यासंदर्भात सचिवाने कबुलीही दिली दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे प्रकरण-
राज्य राखीव पोलीस दलाच्या पतसंस्थेत सव्वा कोटींचा घोटाळा झाल्याची बातमी ईटीव्ही भारतने 24 जानेवारी 2020 ला प्रकाशित केली होती. सुमारे हजार कर्मचारी या राखीव पोलीस दलामध्ये आहेत. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून खासगी कंपन्या गृहकर्ज व इतर कर्ज देऊ लागल्यामुळे अनेक गरजूंनी बाहेरून कर्ज घेतले. त्यामुळे सध्या पतसंस्थेमध्ये सुमारे 400 कर्मचाऱ्यांचे पैसे गुंतले आहेत. कर्मचाऱ्यांच्या उज्वल भविष्यासाठी असलेली ही पतसंस्था सचिवाच्या लाचखोरी मुळे दिवाळखोरीत निघाली आहे.
पतसंस्थेमध्ये अपहार झाल्याचे उघडकीस आल्यानंतर या पतसंस्थेच्या अपहरासंदर्भात प्रभारी लेखापाल व्ही .एम कुलकर्णी, बिनतारी संदेश यंत्रणेचे पोलीस निरीक्षक आर. व्ही .काथार, पोलीस निरीक्षक वि.द. जगताप या तिघांची सही असलेले सील 12 जून रोजी लावण्यात आले होते. मात्र त्यानंतर तडजोडी अंती हे सील उघडण्यात आले. गेल्या चौदा वर्षांपासून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अवचार हे पतसंस्थेचा कारभार पाहत होते. ते आता सेवानिवृत्त झाले आहेत.
1 एप्रिल 19 ते 31 मार्च 20 दरम्यान अपहार-
दिनांक 4 सप्टेंबर 2019 रोजी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक तीनच्या सेवकांच्या पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. यामध्ये लेखा परीक्षक म्हणून सुधाकर बाबुराव पाटेकर, प्रमाणित लेखापरीक्षक सहकारी संस्था जालना यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानुसार पाटेकर यांनी अभिलेखांची पाहणी केली असता पतसंस्थेचे तात्कालीन सचिव भास्कर अश्रुबा अवचार यांनी दिनांक 31 मार्च 2019 अखेर वि. वि. जमदाडे, आर. यस. कठाळे, डी. एल. पासवान, जाधव आदि दहा सभासदांचे येणे कर्ज रक्कम रुपये 14 लाख 60 हजार बाकी असूनही त्यांचे खाते नील दाखविले आहे. जालना मर्चंट बँकेतून स्वतः रोखीने व सभासद सी.पी संग्राम यांच्या नावाने एकूण चार धनादेशाद्वारे 1,25,000 रक्कम उचलली आहे. बँक खात्यातील प्राप्त व्याज व बँक कमिशनचा व्यवहार किर्द खात्याला नोंदविला नाही. सभासद कर्ज खाते व सभासद भाग खात्यांमध्ये रजिस्टरची पाने फाडून गायब केली आहेत.
सदर बाजार पोलीस ठाण्यात अपहाराचा गुन्हा दाखल-
एकूण अभिलेखातील तफावत पाहता 37 लाख 69 हजार 500 रुपयांचा अपहार झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. त्याबाबतचा अहवाल जिल्हा निबंधक, सहाय्यक निबंधक, जिल्हा विशेष लेखापरीक्षक सहकारी संस्था यांना सादर केला आहे. तसेच भास्कर आश्रुबा अवचार यांना वरील अपहराबाबत नोटीस बजावली असता त्यांनी सात दिवसात लेखी खुलासा केला आहे. त्यामध्ये त्यांनी 75 हजार रुपयांचा नफा वाटप केल्याचे सांगून 36 लाख 94 हजार पाचशे रुपयांचा अपहार केल्याचे मान्य केले आहे. तसेच नोटरी बॉन्ड लिहून देखील त्यांनी अपहार केलेली रक्कम भरण्यास तयार असल्याचेही कळविले आहे. परंतु पतसंस्थेचा पैसा वापरून आश्रुबा अवचार यांनी सभासदांचा विश्वास घात केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे प्रमाणित लेखापरीक्षक सहकारी संस्था सुधाकर बाबुराव पाटेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एन .बी. भताने हे करीत आहेत.
हेही वाचा-संसदेत महाराष्ट्र : जाणुन घ्या राज्यातील खासदार संसदेत काय बोलले?