जालना - शालेय विद्यार्थी कधी कुठे डोकं लावतील काही सांगता येत नाही. शाळेला सुट्ट्या लागण्यापूर्वी त्यांनी सुट्ट्यांमध्ये खेळण्याची तयारी सुरू केली आहे. येथील श्री म.स्था.जैन विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रांगणात असलेल्या झाडाच्या बियांपासून चेंडू तयार करण्याचा जणू कारखानाच परिसरात सुरू केला आहे.
टाकाऊपासून टिकाऊ; झाडांच्या बियांपासून चेंडू तयार करण्याचा मुलांचा फुकटचा कारखाना - jalna latest news
श्री म.स्था.जैन विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रांगणात असलेल्या झाडाच्या बियांपासून चेंडू तयार करण्याचा जणू कारखानाच परिसरात सुरू केला आहे.
या शाळेच्या परिसरातच एक 'तरवट' वर्गीय झाड आहे. या झाडाच्या पडणाऱ्या बिया शिकेकाईच्या आकाराच्या आहेत. या बियामधून चिकट डिंकासारखा द्रव बाहेर पडतो. मात्र, हा चिकटपणा कमी असल्यामुळे त्यामध्ये पाणी टाकून त्या बिया कुटतात आणि एकजीव करून या बियांपासूनच ही मुले चेंडू बनवत आहेत.
सुट्ट्या लागण्यापूर्वीच त्यांनीही तयारी सुरू केली आहे. सध्या कोरोना आजारामुळे शाळेला नियमित वेळेपूर्वीच सुट्ट्या लागल्या आहेत. मात्र, या मुलांना जणूकाही याची चाहूलच लागली होती, अशा पद्धतीने त्यांनी शाळा सुरू असतानाच हे चेंडू बनवणे सुरू केले आहे. शाळेच्या प्रांगणात असलेल्या ओट्यावर बसून बाजूलाच असलेल्या झाडाच्या बिया वेचून ही मुले त्याला कुटतात आणि त्यामधून ते चेंडू बनवत आहेत. त्यामुळे हे मुले हसत खेळत शिक्षण घेत टाकाऊपासून टिकाऊ करत हा चेंडू तयार करत आहेत. तयार झालेला चेंडू आठ दिवस उन्हामध्ये वाळल्यानंतर मुलांना खेळण्यासाठी तयार होतो. स्वतःच्या मेहनतीतून आणि कुठलाही खर्च न करता या चेंडूसोबत खेळताना आणि हा चेंडू बनवताना मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद मात्र वाखाणण्याजोगा असतो.