जालना - सेल्समनसोबत दुचाकीवर रोख रक्कम घेऊन जाणाऱ्या मित्रानेच दरोड्याचे नाटक करून बॅगमधील धनादेशासह १ लाख 70 हजार रुपये चोरून नेले. त्यानंतर दरोडा पडला असे भासविण्यासाठी स्वतःचे डोके फोडून घेतले. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी अवघ्या २४ तासांमध्ये तपास लावून मुद्देमाल जप्त केला.
जतीन मन्सूर भाई ठक्कर (वय 25, रा. प्रहलादनगर, अहमदाबाद, गुजरात) हा सेल्समनचा व्यवसाय करत होता. जालना येथून त्यांचे जुने सहकारी बाळू लंगोटे (वय २४ रा. लोधी, मोहल्ला जालना) हे दोघे 27 फेब्रुवारीला रात्री साडेआठच्या सुमारास औरंगाबादकडे जात होते. जालना-औरंगाबाद रोडवर असलेल्या नागेवाडीजवळील एकता धाब्याच्या पुढे काही अंतरावर हे दोघे लघुशंकेसाठी थांबले. त्यादरम्यान पाठीमागून येणाऱ्या ४ जणांनी या दोघांच्या डोळ्यात मिरचीची भुकटी टाकून दांड्याने मारहाण करत त्याच्याजवळची बॅग लांबविली.
यासंदर्भात ठक्कर यांच्या तक्रारीवरून चंदजिरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता, या गुन्ह्याचा तपास करत स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सिंह गौर यांनी माहिती घेऊन बाळू लंगोटे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलीसी खाक्या दाखविताच त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्या सांगण्यावरून सुशांत राजू भुरे (वय २० रा. रामनगर कानडी मोहल्ला जालना), रवी आनंद प्रसंग कूलसंगवाढ (वय २५ रा. सरस्वती मंदिराजवळ खरपुडी रोड जालना), लक्ष्मण किसन गोरे (वय २२ रा. सरस्वती मंदिराजवळ खरपुडी रोड जालना) आणि अमोल एकनाथ काचेवाढ (वय २२) हा देखील सरस्वती मंदिराजवळच राहणारा आहे.
या चौघांनी मिळून बाळू लंगोटे यांच्या सांगण्यावरून जतीन ठक्कर आणि बाळू लंगोटे यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली. तसेच कोणाला संशय येऊ नये म्हणून बाळू लंगोटे याने अंधारात जाऊन स्वतःच्या डोक्यात दगडाने मारहाण करून दुखापत करून घेतली. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास लावल्यानंतर हा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यांमध्ये स्वाक्षरी केलेले २ धनादेश, दीड लाख रुपये किमतीच्या ३ दुचाकी, २० हजाराचे २ मोबाईल, रोख ३३ हजार ६०० रुपये असे एकूण २ लाख २६ हजार ७२५ रुपये कमाल किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. ही कामगिरी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जयसिंग परदेशी, कांबळे, गोकुळसिंग कायते, विनोद गडदे, कृष्णा पतंगे, सचिन चौधरी आणि राठोडसह पथकांनी पार पाडली.