जालना -जिल्हाधिकाऱ्यांनी काल दिनांक 6 रोजी आदेश काढून जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व प्रतिष्ठाने व दुकाने बंद राहतील असे सूचित केले होते. मात्र, या आदेशाचा सर्वांनी आपल्या पध्दतीने अर्थ घेत दारूची दुकाने सुरू ठेवली होती. यामुळे दोन्ही दिवस दारूच्या दुकानांवर प्रचंड गर्दी होती.
काल दिवसभर दारूच्या दुकानांवर असलेली गर्दी लक्षात घेता दुकाने जीवनावश्यक वस्तू मध्ये येतात का असाही संभ्रम निर्माण झाला होता. यानंतर दुकानांवर होणारी गर्दी आणि जिल्हाधिकाऱ्यांचे पायदळी तुडवले जाणारे आदेश यामुळे सामान्य जनता त्रस्त झाली होती. "करायचे एकाने आणि भरायचे दुसऱ्याने" असा हा प्रकार होता. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागावर टीकेची झोड उठली होती. नेमका काय आदेश आहे हे जाणून घेण्याचा ई टीव्हीच्या प्रतिनिधीने प्रयत्न केला. राज्य उत्पादन शुल्काच्या अधीक्षिका भाग्यश्री जाधव यांच्याकडून माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की, या आदेशाविषयी आम्ही संभ्रमात आहोत. मात्र, दुपारी जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून नेमका काय आदेश आहे हे जाणून घेऊ. त्यानंतर, जालना जिल्ह्यातील सहा वाईन शॉप, 87 देशी दारूची दुकाने आणि सुमारे 300 परमिट रूम या पूर्णतः बंद राहणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.
दारुची दुकानांवर गर्दी..