जालना - सकल मराठा समाजाने ओबीसीमधून आरक्षण मिळवण्यापेक्षा हक्काच्या असलेल्या एसीबीसी या प्रवर्गातून आरक्षण मिळवावे, ही आपली भूमिका आहे. ओबीसीमधून आरक्षण मागणाऱ्या सकल मराठा समाजाची भूमिका ही माझी भूमिका नाही, असे स्पष्ट मत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी जालना येथे व्यक्त केले. सकल मराठा समाजाच्यावतीने आज मराठा आरक्षण जागर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. तर, अध्यक्ष म्हणून नरेंद्र पाटील यांची उपस्थिती होती.
हेही वाचा -राज्यात कोरोना चाचण्यांचे दर केले चौथ्यांदा कमी; 980 रुपयात होणार चाचणी
मराठा समाजाला बहुजन समाजाच्या प्रवाहात आणणे हाच एकमेव उद्देश
पुढे बोलताना संभाजीराजे म्हणाले की, मराठा समाज हा मागासलेला असल्याचे सिद्ध झाले आहे. मागासवर्गीय आयोगाने देखील हे सिद्ध केले आहे, मग आरक्षण का मिळत नाही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. ओबीसी प्रवर्गाच्या या माध्यमातून आरक्षण मागण्यापेक्षा एसीबीसी आरक्षण कसे मिळेल याकडे आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे. ज्याप्रमाणे उद्दिष्ट गाठण्यासाठी घोड्याच्या डोळ्यांना झापड लावतात आणि तो घोडा उद्दिष्ट गाठण्यासाठी सरळ पळतो, त्याप्रमाणे एकच लक्ष डोळ्यासमोर ठेवून हे आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. विविध प्रवर्गातून आरक्षणाची मागणी पुढे आली तर सरकार देखील बुचकळ्यात पडेल आणि आरक्षण द्यायचे कोणत्या प्रवर्गातून हा तिढा न सोडवता आरक्षण देण्याच्या भानगडीमधून स्वतः बाजूला सरकेल, त्यामुळे सरकारला गोंधळात न टाकता एसीबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवून देणे आणि सकल मराठा समाजाला बहुजन समाजाच्या प्रवाहात आणणे हाच आपला एकमेव उद्देश असल्याचेही संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.