जालना - घनसावंगी येथील सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने पशुपालकाकडे लाच मागितल्याने लाचप्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. बाळासाहेब भागोजी राजूरकर (वय-58) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. गाईच्या मोडलेल्या पायावर उपचार करण्यासाठी आणि औषधे देण्यासाठी राजूरकरने पाच हजार रुपयांची लाच मागितली होती.
बाळासाहेब भागोजी राजूरकर सहायक आयुक्त पशुसंवर्धन तालुका अधिकारी पदावरून सेवानिवृत्त झालेला आहे. मात्र, शासनाच्या अर्धवेतन निर्णयानुसार तो सध्या घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे कार्यरत आहे. 19 नोव्हेंबरला तक्रारदाराने गाईचा पाय मोडल्यामुळे तिला कुंभार पिंपळगाव येथील पशुचिकित्सालयात उपचारासाठी नेले. त्यावेळी बाळासाहेब राजूरकर याने गाईवर उपचार करण्यासाठी पाच हजार रुपये मागितले. मात्र, तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली.