जालना- कोरोना विषाणूने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. त्यामुळे, संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे भोकरदन तालुक्यातील बाणेगाव येथील हातावर पोट असणाऱ्या गरीब कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच शासनाकडून मिळत असलेल्या रेशनातही भ्रष्टाचार होत असल्याने गावातील नागरिक हवालदिल झाले आहेत.
लॉकडाऊन काळात शासनाकडून गरीब कुटुंबांना मोफत धान्य दिले जात आहे. या पार्श्वभूमीवर बाणेगाव येथील सरकार मान्य रेशन दुकानदार गुलाबराव दाजीबा भालेराव यांच्या दुकानातून हे मोफत धान्य गावकऱ्यांना देणे अपेक्षित आहे. मात्र, धान्य वितरणात भ्रष्टाचार होत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणने आहे. दुकानदाराकडून गरीब कुटुंबांना मोफत आलेला तांदुळ कमी प्रमाणात वाटप करण्यात येत आहे. दुकानदाराकडून लाभार्थ्यांना रेशन कार्ड देणे अपेक्षित होते, मात्र ते मिळाले नसल्याचा आरोपही लाभार्थ्यांनी केला आहे. तसेच, रेशन कार्ड अद्यायावत करण्यासाठी दुकानदाराने लाभार्थ्यांकडून आधारकार्डच्या प्रति घेतल्या होत्या. मात्र, ते अद्यायावत झाल्या नाहीत. त्यामुळे, रेशन घेताना लाभार्थ्यांचे ऑनलाईन नाव दिसत नसल्याने दुकानदाराने धान्य दिले नाही. दुकानदाराच्या हलगर्जीपणामुळे हे सर्व झाल्याचे लाभार्थ्यांचे म्हणने आहे.