बदनापूर (जालना)- बदनापूर तालुक्यात कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर केले. त्यामुळे, नागरिकही घरातच राहून कोरोनामुक्तीच्या लढाईत सहभागी झाले आहेत. परंतु, लॉकडाऊन पाळत असताना शहरातील काही कुटुंबांकडील जीवनावश्यक वस्तू संपल्या आहेत. अशांच्या मदतीला मकरंद अनासपुरे व नाना पाटेकर यांची 'नाम फाऊंडेशन' धावून आली असून संस्थेतर्फे १० लाख रुपयांचे अन्नधान्य किट तालुक्यातील विविध गावांमध्ये वाटप केले जात आहे.
युवा सेनेचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांना लॉकडाऊनदरम्यान ग्रामीण भागातील काही ग्रामस्थांची अतिशय बिकट परिस्थिती असल्याचे लक्षात आले. याबाबत त्यांनी नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या नाम संस्थेशी संपर्क साधला. संस्थेनेही सकारात्मकता दाखवत जिल्ह्यात रेशन किट वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला. त्यानुसार जालना जिल्ह्यातील नामचे संयोजक भाऊसाहेब घुगे आणि इतर समन्वयक यांच्यामार्फत जवळपास १० लाख रुपयांचे रेशन किट बदनापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये वितरित केले जात आहे.