जालना- जोपर्यंत मी आहे तोपर्यंत गोहत्या बंद होणार नाहीत, असे वादग्रस्त विधान केल्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. भोकरदनमधील प्रचारसभेत भाषण करतानाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
जोपर्यंत मी आहे, गोहत्या बंदी नाही... रावसाहेब दानवेंचा व्हिडिओ व्हायरल!
आपल्या वादग्रस्त विधानांनी कायम चर्चेत राहणारे रावसाहेब दानवे हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत गोहत्या बंद होणार नाहीत, असे विधान त्यांनी जालन्यात सुरु असलेल्या भाषणात केले आहे. या भाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे...
भोकरदनमधील लोकांना सरकारकडून २ रूपये किलो गहू मिळतो, ३ रूपये किलो तांदूळ मिळतो. ते सर्व बंद करू काय? एका दिवसात ते सर्व बंद होऊ शकते. नरेंद्र मोदींनी गोवंशहत्या बंदी केली होती. त्यानंतर, ईदला कुर्बानी देण्यासाठी गोहत्या करण्याची परवानगी मागायला माझ्याकडे तुमच्यातील काही लोक आले होते. जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत तुम्हाला जेवढ्या गोहत्या करायच्या आहेत तेवढ्या तुम्ही करू शकता, असे या व्हायरल झालेल्या भाषणामध्ये रावसाहेब दानवे बोलताना दिसत आहेत. तर दुसरीकडे, मी असे काही बोललोच नसल्याचे रावसाहेब दानवे यांचे म्हणणे आहे. चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ एडिट करून व्हायरल केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
हेही वाचा : भोकरदनमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंचे सहकुटुंब मतदान