जालना- भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरेच असतील अशी डरकाळी फोडणाऱ्या शिवसेनेच्या शिलेदारांनी आता उपमुख्यमंत्री पदावर दावा केला आहे. या संदर्भात बोलताना भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांनीदेखील या मागणीचे स्वागतच केले आहे.
'आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री झाले तर आनंदाची गोष्ट' - aditya thackeray
शिवसेनेने उपमुख्यमंत्री पदावर दावा केला आहे. याबाबात रावसाहेब दानवे यांनी दोन्ही पक्षातील नेत्यांची बैठक होईल आणि यातून पुढील दिशा ठरेल, अशी प्रतिक्रिया दिली.
शिवसेनेचे जालना विधानसभेचे उमेदवार अर्जुन खोतकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर खासदार दानवे हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी आदित्य ठाकरे यांच्या उपमुख्यमंत्रीपदाबद्दल बोलताना खासदार दानवे म्हणाले की, ठाकरे उपमुख्यमंत्री झाले तर चांगलीच गोष्ट आहे. अशी इच्छा प्रत्येकाच्या मनामध्ये व्हायला पाहिजे. ते पूर्ण करण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील. दरम्यान, आत्तापर्यंत भाजप-सेना युती ही कायम आहे. यावेळी देखील राज्यामध्ये 220 ते 225 जागा या निवडून येणार आहेत, असे भाकीतही खासदार दानवे यांनी वर्तविले.
हेही वाचा - अर्जुन खोतकरांनी भरला शिवसेनेतर्फे उमेदवारी अर्ज