जालना- देशमुख आले, त्यांनी ऐकले आणि ते गेले, असाच प्रकार आज शहरात पाहायला मिळाला. खासदार रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यातील वाद मिटवण्यासाठी राज्याचे सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख आज सकाळी जालन्यात खोतकर यांच्या निवासस्थानी आले होते. मात्र, १ तास बंद दाराआड झालेली चर्चा गुऱ्हाळ ठरली आहे.
गेल्या वर्षभरापासून भाजपचे प्रदेशाध्यक्ष दानवे आणि राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री अर्जुन खोतकर यांच्यात सुरू झालेले युद्ध दिवसेंदिवस वेगळे वळण घेत आहे. त्यातच दोघांनाही युती होणार नाही, असे वाटल्यामुळे आपापल्या पद्धतीने एक दुसऱ्यावर टीकाटिप्पणी करण्याची संधी दोघांनीही सोडली नाही. त्यामुळे हे वाद विकोपाला गेले आहेत. दररोज एकदुसऱ्याच्या विरोधात टीका करायच्या आणि पुन्हा एकदा व्यासपीठावर येऊन गप्पा मारायच्या हे नेहमीचेच होते. त्यामुळे या दोघांमधील वाद मिटवण्यासाठी आज महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर देशमुख सकाळीच दानवे यांच्यासह खोतकर यांच्या निवासस्थानी दाखल झाले.
खोतकर यांच्या बंगल्यावर खासदार दानवे, अर्जुन खोतकर, सुभाष देशमुख आणि खोतकर यांचे व्याही अॅडव्होकेट झोल या चौघांमध्ये ही चर्चा झाली. मात्र, बाहेर आल्यानंतर देशमुख यांनी काहीही निर्णय सांगितला नाही. मुख्यमंत्र्यांनी दिलेला निरोप खोतकर यांना दिला असून चर्चेसाठी बोलावले असल्याचे देशमुख म्हणाले. तसेच दोघांमध्ये सकारात्मक चर्चा झाली असून पुढच्या काळात दोघांनीही लोकसभा आणि विधानसभा ताकदीने लढावी, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. दोघांनीही आपआपला पक्ष वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नातून थोडासा संघर्ष झाला असेल. मात्र, आता पक्ष वाढवण्यापेक्षा युती वाढवण्यासाठीच दोघेही प्रयत्न करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच खोतकर शिवसेना सोडून कुठल्याही पक्षात जाणार नसल्याचे भाकीतही त्यांनी व्यक्त केले.
दरम्यान खोतकर यांनी रणांगण सोडले नसल्याचा पुनरुच्चार केला. देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांनी चर्चेला बोलावल्याचा निरोप दिला. मात्र, अंतिम निर्णय उद्धव ठाकरे यांच्या न्यायालयात होईल, असे खोतकर यांनी सांगितले. येत्या २ दिवसात हा निर्णय जनतेला सांगणार असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान आज आणि २ दिवसांपूर्वी दोघेही एकत्र बसलो होतो. त्यामुळे कुठलाही वाद शिल्लक नसल्याची प्रतिक्रिया खासदार दानवे यांनी दिली.