जालना - भोकरदन तालुक्यात गेल्या २ दिवसांपासून ढगाळ वातावरण असून धुक्याचाही प्रभाव जाणवत आहे. तर, काही ठिकाणी रिमझिम पावसाच्या सरी बरसल्याने किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्याच्या वातावरणामुळे रब्बी पीक धोक्यात आल्यामुळे शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र तालुक्यात पाहावयास मिळत आहे.
मागील महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांनी शेतामध्ये सोंगुन ठेवलेले मका, बाजरी, सोयाबीन आदी पिकांची कणसे भिजून त्याला कोंब फुटले. तर, कपाशीचे बोंडं भिजून त्यालासुद्धा कोंब फुटले होते. यामुळे, शेतकरी मोठ्या अस्मानी संकटामध्ये सापडले होते. तर, आता भोकरदन तालुक्यामध्ये गेल्या २ दिवसांपासून वातावरणातील बदल तसेच रिमझिम पावसामुळे तुर, ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांवर परिणाम होणार आहे. यामुळे आधीच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांवर आणखी संकट ओढावले आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठी आर्थिक टंचाई निर्माण होणार असल्याचे बोलले जात आहे.