जालना - रेल्वे प्रशासन आता रेल्वेच्या हद्दीमध्ये उभ्या राहणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सीला देखील मासिक भाडे आकारणार आहे. या संदर्भातील जनजागृती रेल्वे प्रशासनाने सुरू केली आहे. मात्र, रिक्षाचालकांनी या भाड्याला कडाडून विरोध केला आहे. त्यामुळे तूर्तास जरी या रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाईचे धोरण ठरले नसले तरी, भविष्यात मात्र या रिक्षाचालकांना रेल्वे प्रशासनाच्या कारवाईला सामोरे जावे लागणे असण्याची शक्यता आहे.
रेल्वेच्या हद्दीत रिक्षा उभी करायची असल्यास त्यावर रेल्वे प्रशासनामार्फत दिलेले स्टिकर असणे बंधनकारक केले आहे. यासंदर्भातील नियम लागू करायची तारीखही लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून, आधार कार्ड, वाहन चालवण्याचा परवाना, वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र आणि पोलिसांनी जारी केलेले चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र अशी ४ कागदपत्रे असणे बंधनकारक आहे. त्यानंतरच रेल्वे प्रशासन रिक्षावर चिकटवण्यासाठी स्टिकर जारी करणार आहे. यासोबतच दरमहा ३०० रुपये आकारले जाणार आहेत. यासोबत टॅक्सी(कार) चालकांना देखील हे बंधनकारक असणार आहे.
सध्या असलेल्या वाहनतळाच्या बाजूला त्यांना ही जागा दिलेली आहे. दरम्यान जे रिक्षाचालक हे प्रमाणपत्र घेणार नाहीत त्यांना स्थानकामध्ये प्रवासी सोडून लगेच रेल्वे हद्दीच्या बाहेर जावे लागणार आहे. यासंदर्भात रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रिक्षाचालकांशी संपर्क साधून जनजागृती केली आहे. मात्र, अद्याप रिक्षाचालकांनी फारसा प्रतिसाद दिलेला नाही. दरम्यान जालन्यात आत्तापर्यंत कार, टॅक्सी नव्हत्या. मात्र, आता ४ कार टॅक्सी येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या टॅक्सी चालकांनी रेल्वे प्रशासनाकडे पार्किंगसाठी जागा देण्याची विनंती केलेली आहे. यासोबत रेल्वेस्थानकावर समोरच नो पार्किंग मध्ये दुचाकी वाहने उभी करण्यात येतात. यासाठीदेखील जाहीर निविदा काढण्यात येणार आहेत. तर, सध्या असलेल्या पार्किंगच्या दरापेक्षा हे दर दुप्पट असणार आहेत. वाहनचालकांनी येथे वाहन न लावता सामान्य पार्किंगकडे वाहने लावावी हा त्यामागचा उद्देश आहे. त्यामुळे आता रिक्षा असो किंवा स्वतःचे दुचाकी वाहन, २ मिनिटं असो किंवा २ तास रेल्वे प्रशासन भाडे आकारणार हे मात्र निश्चित झाले आहे.