जालना - सध्या सणासुदीचे दिवस सुरू झाले असून परिसरातील शेतकरी कापूस विक्रीसाठी आणत आहेत. त्या कापसाची व्यापारी बेभाव खरेदी करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे, येथील सत्यनारायण जिनिंग अँड प्रेसिंग येथे कृषी उत्पनन बाजार समितीचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री अर्जुन खेातकर यांच्या हस्ते कापूस खरेदीस प्रारंभ करण्यात आला. यावेळी आलेल्या कापसास सहा हजार रुपयांचा भाव देण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांतही आनंद व्यक्त होत आहे.
यावर्षी केंद्र सरकारने कापसाचा हमी भाव 5 हजार 825 रुपये ठरवलेला आहे. बदनापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे कापसाच्या उत्पादनात घट झाली, तसेच सततच्या पावसाने कापूस वेचणीपूर्वी व वेचणीनंतरही भिजल्यामुळे शेतकऱ्यांपुढे संकट निर्माण झाले होते. त्यातच शासकीय कापूस विक्री केंद्र सुरू नसल्यामुळे शेतकऱ्यांना आपला कापूस खासगी व्यापाऱ्यांना विक्री करावा लागत होता. सध्या दसरा–दिवाळीचे दिवस असल्यामुळे शेतकऱ्यांचा हा कापूस भिजलेला असल्याचा ठपका ठेऊन बाजारात 4 हजार 100 ते 4 हजार 600 रुपयांप्रमाणे व्यापाऱ्यांकडून खरेदी करण्यात येत होता. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा व कापूस विक्री सोपी व्हावी म्हणून तालुक्यातील राजेंद्र तापडिया, पवन तापडिया, शामसुंदर तापडिया यांनी पुढाकार घेऊन सत्यनारायण जिनिंग व प्रेसिंग येथे दसऱ्याच्या मुहुर्तावर कापूस खरेदी सुरू केली.