जालना - सध्या असलेले सरकार आणि विरोधी पक्ष या दोघांचीही मिलीभगत आहे. हे दोघेही एक दुसऱ्याला सांभाळून घेत आहेत, त्यामुळे भ्रष्टाचार वाढत असून सरकार अशा नेत्यांना पाठीशी घालत आहे. सध्या भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांचा लोंढा पाहता या सर्वांना कोणत्या ना कोणत्या तरी चौकशीची भीती वाटत असल्याने ते भाजपमध्ये जात असल्याचा आरोप आम आदमी पार्टीच्या नेत्या प्रीती मेनन यांनी केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची ईडी मार्फत चौकशी करावी, अशी मागणी आम्ही केली होती. त्यानुसार ती झाली आणि स्वतः भुजबळांनी हे प्रकरण मान्य केले होते, असे असतानाही भाजप सरकारने भुजबळ यांना जामीन देण्यासाठी प्रयत्न केले आणि तो मिळवून दिला, असाही आरोप श्रीमती मेनन यांनी केला.
जालना विधानसभेचे आम आदमी पार्टीचे उमेदवार कैलास फुलारी यांच्या प्रचारार्थ प्रीती मेनन या जालण्यात आल्या होत्या. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या की, विरोधी पक्ष एवढा ओरडत असतानाही हे सरकार व्यवस्थित चालले आहे. लोकसभेच्या निवडणुकीत देखील या सरकारच्या बाजूने तीव्र असंतोष असतानाही त्यांना बहुमत मिळाले कसे? हा एक चमत्कारच आहे. तो चमत्कार पाहून आम्ही देखील त्रस्त आहोत असेही त्या म्हणाल्या.