जालना- उत्तर प्रदेशात हाथरस येथे घडलेल्या दुर्घटनेप्रकरणी शरद पवार यांची प्रतिक्रिया म्हणजे पुतना मावशीचे प्रेम आहे. आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याच बघायचं वाकून, अशी त्यांची प्रवृत्ती असल्याचा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी लगावला. दरेकर हे आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांच्या घरी काही वेळ थांबले असता, दरेकर यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.
हाथरस प्रकरणात शरद पवारांचे पुतना मावशीचे प्रेम; प्रवीण दरेकर यांचा टोला - शरद पवार हाथरस प्रकरण
हाथरस प्रकरणी राजकीय टीका टिप्पनीचे पेव फुटले आहे. शरद पवारांनी हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणावरून यूपी सरकावर टीका केली होती. त्यावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते दरेकर यांनी शरद पवारांचे हाथरस प्रकरणातील प्रेम म्हणजे पुतना मावशीचे प्रेम असल्याची टीका केली आहे.
हाथरस येथे घडलेली घटना ही निंदनीय आहे आणि या घटनेचा भारतीय जनता पार्टीने देखील निषेध केला आहे. त्या संदर्भात योग्य तपासणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत, असे असतानाही शरद पवारांना यात राजकारण दिसत आहे. मात्र आपल्या राज्यात घडलेली रोहा येथील घटना, ज्या घटनेत पीडित महिलेला समुद्रात फेकून दिल्याचे त्यांना दिसत नाही. पिंपरी-चिंचवडमध्ये तरुणीवर बलात्कार करून डोंगरात ठेचून मारले ती घटना दिसत नाही, क्वारंटाईन सेंटरवर तरुणींवर बलात्कार होत आहेत, पवारांना या घटना दिसत नाहीत. मात्र, हाथरस प्रकरणी प्रेम व्यक्त केले जात आहे, त्यांचे हे प्रेम म्हणजे पुतना मावशीचे प्रेम आहे, असा टोलाही प्रवीण दरेकर यांनी लगावला.
हाथरस प्रकरणातील पीडितेचा मृतदेह उत्तर प्रदेश सरकारने तिच्या कुटुंबीयांना का दिला नाही? पीडित मुलीच्या कुटुंबीयांना भेटायला जाणाऱ्या नेत्यांची तुम्ही अडवणूक का करता?, याचाच अर्थ उत्तर प्रदेशात कायद्याचं राज्य आणि मूलभूत अधिकार याला काही अर्थ राहिला नाही, तेथील सरकार बघ्याची भूमिका घेत आहे, अशा शब्दात पवारांनी निषेध व्यक्त केला होता. त्यावर दरेकरांनी निशाणा साधला आहे.