जालना- मुस्लीम समाजाच्या काही नेत्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्याचे नुकतेच जाहीर केले आहे. जालना लोकसभेची जागा चार वेळा हारूनही आज पाचव्यांदा त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला. एव्हढेच नाही, तर मौलवीदेखील मशीदीतून काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत, असे आवाहन करून मौलवींनी समाजाला अडचणीत आणू नये, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. जालना लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. शरदचंद्र वानखेडे यांच्या जाहीर प्रचार सभेत ते आज बोलत होते.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, "मौलवींचे काम हे समाज सुधारणा करणे आहे. समाजाला कुकर्मापासून थांबवून अल्लाहने सांगितलेल्या मार्गावर नेने आहे. त्यामुळे मौलवींनी राजकीय भूमिका घेऊ नये, आणि एमआयएम या पक्षाच्या सूचनेनुसारच काम करावे "असे आवाहनही त्यांनी केले.
काँग्रेसवर टीका करतानाही प्रकाश आंबेडकर यांनी चव्हाण यांच्या घरांवर टीका केली. ते म्हणाले "काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, मी पैसा कुठून आणतो हे विचारत आहेत, मात्र त्यांनी काळजी करू नये. आमची सत्ता आल्यानंतर त्यांनी शेवटच्या दिवशी केलेला करोडो रुपयांचा खर्च कुठून केला, याची चौकशी करू. त्यांच्या सासूबाईंच्या नावाने प्रत्येकी 15 कोटींचे चार फ्लॅट कसे आले, याचीही चौकशी करू "असा हल्लाबोलही त्यांनी केला. भारतीय जनता पक्ष, हा अशोक चव्हाणांना वाचवत असल्याचाही त्यांनी आरोप केला.
राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना आंबेडकर म्हणाले, की अजित पवार अद्यापपर्यंत जेलमध्ये का गेले, नाहीत याचे उत्तर शरद पवारांनी द्यावे ?दुसऱ्याकडे बोट दाखवण्यास सोपे आहे, मात्र स्वतःचे चरित्र डागाळलेले असेल तर माणूस लुळापांगळा होतो. हे दिसतच आहे, अशी उपरोधिक टीकाही त्यांनी शरद पवारांवर केली. म्हणूनच 2014 च्या निवडणुकीनंतर शरद पवारांची लाळ भाजपच्या दारात पडत आहे, असेही ते म्हणाले.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केल्यानंतर आंबेडकरांनी टीकेची तोफ भारतीय जनता पार्टीकडे वळवली. ते म्हणाले नरेंद्र मोदी हे स्वतःला मागासवर्गीय म्हणून मिरवत आहेत. परंतु आम्ही त्यांना जावई करून घेणार नाही. ते जर मागासवर्गीय होते, तर गेल्या साडेचार वर्षात मागासवर्गीयांची शिष्यवृत्ती का दिली नाही ? याचे त्यांनी उत्तर द्यावे. नोटाबंदी करून त्यांनी अमित शाह यांच्या खात्यामध्ये पंधरा लाख कोटी टाकल्याचा आरोपही आंबेडकरांनी यावेळी केला. नोटाबंदीनंतर काळा पैसा गेला कुठे याचे उत्तर मोदींनी द्यावे, असेही ते म्हणाले. वंचित बहुजन आघाडीचे लोकसभा उमेदवार डॉ. शरदचंद्र वानखेडे, भारिपचे जिल्हाध्यक्ष दीपक ढोके, आदींचीही यावेळी समयोचित भाषणे झाली.