जालना - वंचित बहुजन आघाडीचे सरकार आल्यावर जुनी पेन्शन योजना लागू करू असे, आश्वासन वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी आज (शुक्रवार) जालन्यात दिले. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने फुलंब्रीकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या राज्यव्यापी बलुतेदार-आलुतेदार सत्तासंपादन निर्धार ते बोलत होते.
जालना येथे आयोजित मेळाव्यात बोलताना प्रकाश आंबेडकर विधानसभेची तयारी करण्यासाठी प्रकाश आंबेडकर हे जालन्यात आले होते. या वेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. शरदचंद्र वानखेडे, जिल्हाध्यक्ष दीपक डोके, भीमराव दळे, आदींची उपस्थिती होती. सोनार, कुंभार, कोष्टी, शिंपी, माळी, तसेच ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश होणाऱ्या अन्य समाजातील ही पदाधिकारी मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा - ठरलं..! उदयनराजेंच्या हाती 'कमळ', मोदींच्या उपस्थितीत दिल्लीत उद्या भाजपप्रवेश
प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, सत्तेवर आल्यानंतर जनगणना करणारच आहोत. यामध्ये जातीवादाचा प्रश्न नाही, तर आपल्याकडे असलेल्या जातींपैकी किती जाती शिल्लक राहिल्या आहेत हा तपासण्याचा उद्देश आहे. आधुनिक अर्थव्यवस्थेमुळे बलुतेदार पद्धती बंद झाली आहे. जुनी अर्थव्यवस्था ही अत्याचारी अर्थव्यवस्था होती हे मान्य आहे. परंतु आधुनिक अर्थव्यवस्थेमध्ये जुन्या बलुतेदार कलेची गरज आहे. त्यांच्यातील उपजत असलेले हे गुण महत्त्वाचे आहेत. त्यांच्या या गुणांला नव्या अर्थव्यवस्थेमध्ये जुळवून घेण्यासाठी शासनाने प्रयत्न करायला पाहिजेत असे ते म्हणाले.
हे सरकार दारुड्यांचे सरकार
सरकारवर कडाडून टीका करताना आंबेडकर पुढे म्हणाले की, हे सरकार दारुड्यांचे सरकार आहे. एखादा दारूडा खिशातील पैसे संपल्यानंतर ज्याप्रमाणे चुकीच्या मार्गाने घरातील वस्तू विकून पैसा उपलब्ध करण्याचा प्रयत्न करतो, त्याप्रमाणे या सरकारचा रिझर्व बँकेच्या ठेवींवर डोळा आहे. सद्य परिस्थिती पाहता काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी ज्या पद्धतीने या पक्षात भरती होत आहेत त्यामुळे यांना जर विरोधी पक्ष राहिला नाही तर हे काय करतील याचा काहीच नेम नाही. बँकेत ठेवलेल्या ठेवी देखील आज सुरक्षित नाहीत .त्या सुरक्षित राहाव्यात यासाठी सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्यांनी असोसिएशन तयार करून बँक टिकवण्यासाठी प्रयत्न करावेत असेही ते म्हणाले.
हेही वाचा - कोकणात राष्ट्रवादीला धक्का, भास्कर जाधवांनी 'घड्याळ' काढत बांधले 'शिवबंधन'
ट्रम्प यांच्या हातावर टाळी देण्यामागे राजकारण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हातावर टाळी देऊन स्वतःची लोकप्रियता वाढविली, परंतु यामागे खरे राजकारण म्हणजे अमेरिकेचा कापूस खरेदी करण्यास चीन ने नकार दिला आहे. कापूस भारताने खरेदी करावा, असा ड्रम्प यांचा प्रयत्न आहे. यामुळे आपल्या देशातील शेतकऱ्यांच्या कापसाचा भाव कमी होणार आहे. त्यामुळे सरकारचा लोकप्रियता वाढविण्यावर भर असून देशातील शेतकरी देशोधडीला लागला तरी त्याची पर्वा या राज्यकर्त्यांना नाही. शेतकऱ्यांच्या या प्रश्ना सोबतच बेरोजगारी, मंदी, पिण्याचा पाण्याचा प्रश्न, शिक्षणाचा प्रश्न आदी सर्वच बाबींवर प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केले.
हेही वाचा - राष्ट्रवादीला रामराम..! अखेर भास्कर जाधवांनी दिला आमदारकीचा राजीनामा