जालना- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( LOP Devendra Fadnavis ) यांनी आजदेखील सभागृहात गोंधळ घातला. त्यांनी सभागृहात का नुरा कुस्ती खेळली, असा सवाल करत त्या कुस्तीतून काहीही निष्पन्न होणार नाही, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांनी दिली आहे.
प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया काय म्हणाले प्रकाश आंबेडकर -
फडणवीसांनी जो पेन ड्राईव्ह विधानसभा अध्यक्षांना दिला आहे, त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. हा पेन ड्राईव्ह उद्या फॉरेन्सिक लॅबला गेला की हा फेक आहे, असाच रिपोर्ट येईल. त्यामुळे हा पेनड्राईव्ह जनतेसमोर आणावा. जेणेकरून फडणवीस यांची नुरा कुस्ती न होता खऱ्या अर्थाने तालमीतल्या पहेलवानासारखी त्यांची कुस्ती होईल, असंही आंबेडकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे नुरा कुस्तीतला पैलवान व्हायचं की तालमीतला पैलवान व्हायचं हे फडणवीस यांनी ठरवायचं आहे, असंही आंबेडकर म्हणाले.
दरम्यान, औरंगाबाद शहरात प्रकाश आंबेडकर यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र, या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. दरम्यान जालन्यातील कार्यक्रम संपल्यानंतर मी औरंगाबादला जाणार असून तिथे गेल्यानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा करून तेथील सभा घ्यायची की नाही याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा -Heatwave In Maharashtra : मुंबईसह राज्यातील काही भागात उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा